कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्हीही घटकांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत, त्यानंतरच निर्णय घेणार असल्याची ंंमाहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत मुख्यमंत्री फडणवीस व माझ्यात मंत्रालयात विविध विषयांवर चर्चा झाली. त्यामध्ये कोल्हापूरच्या हद्दवाढीबाबतही चर्चा झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने महापौर अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी कोल्हापूर महानगरपालिकेसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आंदोलनस्थळी मोबाईलवर पालकमंत्र्यांशी संपर्क साधला असता वरील माहिती पालकमंत्र्यांनी क्षीरसागर यांनी दिली. क्षीरसागर यांनी ही माहिती आपल्या भाषणाद्वारे सर्वांना सांगितली. दरम्यान, राज्य शासनाने हद्दवाढीबाबत तातडीने अधिसूचना काढावी, अन्यथा २२ आॅगस्टपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा सर्वपक्षीय हद्दवाढ कृती समितीच्यावतीने या आंदोलनादरम्यान देण्यात आला. १८ गावे आणि दोन एमआयडीसी यांचा हद्दवाढीमध्ये समावेश करावा, अन्यथा ४-५ गावांना घेऊन आम्हाला हद्दवाढ नको, असाही इशारा यावेळी सर्वपक्षीय नेत्यांनी आपल्या भाषणात दिला.
हद्दवाढीसंदर्भात दोन दिवसांत मुंबईत बैठक
By admin | Published: August 15, 2016 1:21 AM