महापौर सुर्यवंशी, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी बुधवारी मुंबईत पालकमंत्री जयंत पाटील यांची बैठक घेऊन महापालिकेच्या प्रस्तावित प्रकल्पाबाबत चर्चा केली. याबाबत सुर्यवंशी म्हणाले की, महापालिकेने कुपवाड शहरासाठी ड्रेनेज योजनेचा आराखडा तयार केला आहे. २५० कोटी रुपये खर्चाच्या हा आराखडा शासनाला सादर करण्यात आला आहे. कुपवाड शहरात ड्रेनेज नसल्याने अनेक समस्या उदभवत आहेत. नागरिकांनी ड्रेनेज योजनेची मागणी केली आहे. हा प्रकल्पाला मंजुरी मिळावी, यासाठी पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावरही आज चर्चा झाली.
शेरीनाल्यातील पाणी कृष्णा नदीत मिसळूने पाणी प्रदूषित होते. त्यासाठी जिजी मारुती, हरिपूर रोड व शेरीनाला या तीन नाल्यांतील पाणी एकाच ठिकाणी उचलून त्याच्या शुद्धीकरणाची यंत्रणा उभारण्यासाठी ६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हा प्रस्तावही शासनाकडे सादर करण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेत पाच जिल्ह्यांचे आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे. या केंद्राच्या सक्षमीकरणासाठी ४५ कोटी ७५ लाख रुपयांच्या निधीची गरज आहे. या तीन प्रकल्पांबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला आहे. तिन्ही प्रकल्पांवर पुढील आठवड्यात संबंधित मंत्रालयात बैठक घेऊन ते मार्गी लावण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.
चौकट
जयंत पाटील मंगळवारी महापालिकेत
सत्ताधारी भाजपचा महापौर निवडीत करेक्ट कार्यक्रम केल्यानंतर पालकमंत्री जयंत पाटील हे मंगळवारी महापालिकेत येणार आहेत. पालकमंत्री झाल्यापासून जयंत पाटील यांनी अनेकदा महापालिकेत बैठक घेणार असल्याचे सांगितले होते. पण ते कधी पालिकेत आले नव्हते. एक महिन्यापूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यावेळी प्रथमच ते महापालिकेत आले. आता महिन्यानंतर ते सत्ताधाऱ्यांचे नेते म्हणून त्यांचे पालिकेत आगमन होईल. त्यावेळी विविध विकासकामांचा आढावाही घेतला जाणार आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीने त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू केली आहे.