लोकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची प्राथमिक मतदार यादी १२ एप्रिल रोजी प्रसिद्ध झाली. या यादीमध्ये अनेक मतदाराच्या नावापुढे जिवंत असूनही ‘मयत’ असा शेरा लागला आहे. अशा जवळपास १०० सभासदांनी २२ एप्रिलपर्यंतच्या विहित कालावधीत मतदार यादीवर आक्षेप घेतला होता. यावरील सुनावणीसाठी मंगळवार दि. २७ एप्रिल रोजी ११ वाजता आवश्यक कागदपत्रासह जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सहसंचालक (साखर) पुणे या कार्यालयात उपस्थित राहून आपले म्हणणे सादर करावे, असे पत्र संबधित सभासदांना देण्यात आले आहे.
कृष्णा कारखान्याच्या प्राथमिक मतदार
यादीत आपल्या नावपुढे ‘मयत’ शेरा असल्याचे पाहून अनेक सभासदांनी तत्काळ आक्षेप नोंदविला आहे. या सभासद मतदारांनी ग्रामसेवकांकडून हयातीचे पत्रही घेतले आहे. तरीही या सभासद मतदारांना आता ओळखपत्र व आवश्यक कागदपत्रासह जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी तथा प्रदेश सहसंचालक साखर पुणे यांच्या कार्यालयात समक्ष हजर राहून हयात असल्याचे सिद्ध करावे लागणार आहे. यामुळे विनाकारण आणि कोणताही
दोष नसताना या सभासद मतदारांना मनस्तापाला सामाेरे जावे लागत आहे. कोरोनाच्या संकट काळात जिल्हा बंदी असताना या सभासदांना या पत्राच्या आधारे पोलीस सोडणार का? हा प्रश्न आहेच. याशिवाय दूरच्या प्रवासामुळे कोरोना संसर्ग होण्याचीही भीती आहे. यामुळे ही सुनावणी स्थानिक पातळीवर जवळच्या कार्यालयात घ्यावी, अशी मागणी संबधित सभासद करीत आहे.
चौकट
कारखाना प्रशासनाची चूक
जिवंत मतदाराच्या नावापुढे ‘मयत’ शेरा लागला आहे. ही चूक कारखाना
प्रशासनाची आहे आणि त्रास संबंधित सभासदाला होत आहे. निवडणूक
अधिकाऱ्यांनीही जाब देणार म्हणून कारखान्याचे कार्यकारी संचालक
यांना कार्यवाहीस्तव प्रत देऊन आक्षेप घेणाऱ्या अर्जदारास सुनावणी नोटीस देऊन पोहोच पावतीसह अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.