विकास शहाशिराळा : येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मारकासाठी २५.०० कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या स्मारक, स्मृतिस्थळामुळे भावी पिढीला इतिहास समजेल तसेच युवकांना स्फूर्ती देणारा हा परिसर बनणार असल्याची माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.आमदार नाईक म्हणाले, इतिहासात मोघल सैन्य छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद करून बहाद्दर गडाकडे घेऊन जात असताना शिराळा येथील भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. यामध्ये सरदार जोत्याजी केसरकर, सरदार आप्पासाहेब शास्त्री- दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार व त्यांच्या सोबत असणाऱ्या ४०० मावळ्यांनी हा प्रयत्न केला. याची इतिहासात नोंद असून शिराळासाठी हे सुवर्ण पान आहे. ही घटना पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाणे गरजेचे आहे. भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारणार, असे आश्वासन मी दिले होते. तो शब्द पाळला असून संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी १३.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता या निधीतून छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. हे स्मारक जगभरातील मराठी माणंसासह छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज प्रेमींना प्रेरणा देणारे ठरेल.
Sangli: तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार, १३.५० कोटींचा निधी मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2024 6:57 PM