हंकारे पुढे म्हणाले, कोरोनामुळे एसटी महामंडळ आर्थिक संकटात आहे, याची आम्हालाही कल्पना आहे. पण, सध्या बसेसची वाहतूक सुरळीत सुुरू होत असतानाही ठराविक चालक, वाहकांची जाणीवपूर्वक आर्थिक पिळवणूक केली जात आहे. कर्मचाऱ्यांची रजा मंजूर न करता बिनपगारी केली जात आहे. मान्यताप्राप्त संघटनेतील ठराविक पदाधिकारी रजा घेता दोन ते तीन दिवस गैरहजर असतात, तरीही त्यांचा रजा अर्ज घेऊन त्यांना पगार दिला जातो. जत, कवठेमहांकाळ, तासगाव, इस्लामपूर आणि शिराळा आगारातील अधिकाऱ्यांकडून मानसिक छळ होत आहे. याबाबत विभाग नियंत्रक आमृता ताम्हणकर यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. तरीही त्यांच्याकडून आजअखेर संबंधित आगार प्रमुखांसह अन्य अधिकारी यांच्यावर कारवाई झाली नाही. या घटनेच्या निषेधार्थ दि.१८ डिसेंबर २०२० रोजी सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एवढ्यावरही जर दोषींवर कारवाई झाली नाही, तर परिवहन मंत्री परब यांच्याकडे पाच आगारप्रमुख आणि विभाग नियंत्रकांच्याविरोधात तक्रार करणार आहे, असेही हंकारे, विलास यादव यांनी सांगितले.
चौकट
स्वेच्छा निवृत्तीबद्दल गैरसमज
एसटी महामंडळातील ५० वर्षावरील कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय शासनाने उपलब्ध करून दिला आहे. या आदेशाचा एसटी महामंडळातील अधिकारी चुकीचा अर्थ काढून ५० वर्षावरील चालक, वाहकांना सक्तीने स्वेच्छानिवृत्तीचे अर्ज दिले जात आहेत. यामुळे चालक, वाहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे अधिकाऱ्यांनी हे उद्योग त्वरित थांबवावेत, अशी मागणीही हंकारे यांनी केली.