सांगली : मतिमंद महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी मुलाणवाडी-रामनगर (ता. खानापूर) येथील परशुराम ऊर्फ बाळू सोन्याबा चव्हाण (वय ४०) या आरोपीला बुधवारी दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सुनावली.पीडित मतिमंद महिला खापरगादे (ता. खानापूर) येथे आईकडे राहत होती. १६ एप्रिल २०१५ रोजी रात्री नऊ वाजता ती प्रातर्विधीसाठी बाहेर गेली होती. रात्री उशीर झाला तरी ती घरी परतली नव्हती. त्यामुळे आई बॅटरी घेऊन तिच्या शोधासाठी ओढ्याकडे जाणाऱ्या रस्त्याला गेली होती. त्यावेळी तेथील शाळेच्या व्हरांड्यात आरोपी परशुराम चव्हाण हा तिच्यावर अत्याचार करीत असल्याचे उघडकीस आले होते. पीडित मुलीच्या आईला पाहून चव्हाण पळून गेला होता. आईने मुलीला घरी आणून घरातील लोकांना हा प्रकार सांगितला होता. त्यानंतर विटा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखली केली होती. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करुन चव्हाणला अटक केली होती. त्याच्याविरुद्ध जिल्हा न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित महिलेची आई, वैद्यकीय अधिकारी अन्वेषा रथ यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या साक्षी ग्राह्ण धरून न्यायाधीश सौ. सापटणेकर यांनी आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाची रक्कम पीडित मुलीला देण्याचा आदेशही दिला. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे अॅड. उल्हास चिप्रे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
मतिमंद महिलेवर बलात्कार; आरोपीला दहा वर्षे सक्तमजुरी
By admin | Published: January 04, 2017 11:48 PM