लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे संतप्त झालेले विटा शहरातील व्यापारी बुधवारी रस्त्यावर उतरले. व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन मागे घ्यावा, ही मागणी करीत विटा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी विटा शहराच्या बाजारपेठेतील सर्व दुकाने सुरू करणार असल्याचे सांगत प्रशासनाला ४८ तासांचा अल्टीमेटम दिला.
विटा शहरात मंगळवारपासून लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद करण्यासाठी तहसीलदार ऋषीकेत शेळके, पोलीस निरीक्षक संतोष डोके, मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्यासह सर्व टीम रस्त्यावर उतरली होती. त्यावेळी शहरातील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्यात प्रशासनाला यश आले आहे.
परंतु, कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक लॉकडाऊन लावण्यात आल्याने व्यापारी संतप्त झाले.
बुधवारी विटा सराफ संघटना, कापड, भांडी, फर्निचर, स्टेशनरी, टेलर यांसह विविध संघटनांनी तहसील कार्यालयावर विराट मोर्चा काढला. मायणी रस्त्यावरील पाटील पेट्रोल पंपापासून सुरू झालेला मोर्चा शिवाजी चौकातून तहसील कार्यालयात आला.
त्यावेळी पोलिसांनी मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात आंदोलनकर्त्यांना अडविले. त्यानंतर संघटनेच्या पाच जणांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार ऋषीकेत शेळके यांना मागण्यांचे निवेदन दिले.
यावेळी व्यापाऱ्यांनी लॉकडाऊन मागे घ्यावा व बाजारपेठ सुरळीत सुरू ठेवावी, शासनाच्या सर्व नियमांचे पालन करीत व्यवसाय सुरू ठेवला जाईल, यांसह अन्य मागण्या केल्या.