लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिका क्षेत्रातील रुग्णसंख्या व पाॅझिटिव्हिटी दर कमी असल्याने प्रशासनाने दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, यासाठी गुरुवारी मुख्य बाजारपेठेत ४००पेक्षा अधिक व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. सोमवारपासून दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम होते. अखेर पालकमंत्री जयंत पाटील व जिल्हाधिकारी डाॅ. अभिजित चौधरी यांच्याशी व्यापाऱ्यांचा संपर्क करून देण्यात आला. दोघांनीही सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.
त्यानंतर व्यापाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शेखर माने यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदनही दिले. महापालिका क्षेत्रात रुग्ण संख्या व पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्याने व्यापार व दुकाने सुरू करावीत, अशी मागणी करीत शहरातील हरभट रोड, कापड पेठ, सराफ कट्टा, गणपती पेठ परिसरातील सुमारे ४०० व्यापारी एकत्र आले. सोमवारपासून दुकाने सुरू करण्याचा निर्णयही घेतला. कोल्हापुरात महापालिका व ग्रामीण भागाचा वेगवेगळा पाॅझिटिव्हिटी दर काढून दुकाने उघडण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याच धर्तीवर सांगलीतही निर्णय व्हावा, असा आग्रह व्यापाऱ्यांनी धरला.
राष्ट्रवादी नेते माजी नगरसेवक शेखर माने व व्यापाऱ्यांची बैठक झाली. पालकमंत्री जयंत पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना व्यापाऱ्यांच्या निर्णयाची माहिती देण्यात आला. पालकमंत्र्यांनीही दोन दिवसांत आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली. त्यानंतर व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेतली. शहरातील व्यापार सुरू करण्याबाबत सकारात्मक असून, रविवारपर्यंत पॉझिटिव्हिटी दर तपासून लवकरात लवकर दुकाने सुरू करण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. यावेळी हेमंत खंडागळे, माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, श्यामसुंदर पारीख, राजेश चावला, चेतक देवांग, गुरुनाथ कुलकर्णी, महेश उरुंकर आदी उपस्थित होते
चौकट
व्यापाऱ्यांच्या मागण्या
जिल्हा व महापालिका क्षेत्रातील कोरोना चाचण्या पॉझिटिव्हिटी विभाजन करण्यात यावे, महापालिका क्षेत्रात पॉझिटिव्हिटी रेट कमी असल्यास दुकाने सुरू करण्यास परवानगी द्यावी, महापालिका क्षेत्रात आरटीपीसीआर चाचण्या वाढव्यात, व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करू नये आदी मागण्या व्यापाऱ्यांनी केल्या.