सांगली : कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री, आमदार, लोकप्रतिनिधी व्यापारीवर्गाच्या मागे उभे राहिले. पण सांगलीत मात्र उलट स्थिती आहे. व्यापाऱ्यांच्या अडचणी घेऊन जाण्यासाठी हक्काची जागाच उरली नाही. त्यांना कुणीच वाली उरला नाही, अशी भावना व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी व्यक्त केली. लाॅकडाऊन संपल्यानंतर १ मेपासून व्यापाऱ्यांवर कोणतीही नवी बंधने नकोत, असेही ते म्हणाले.
शहा म्हणाले की, मिनी लाॅकडाऊनमधील दिवसाच्या जमावबंदीचे रुपांतर संचारबंदीत केले आहे. एकीकडे १४४ कलम लागू करण्यात आले. तर दुसरीकडे हातगाडे, शिवभोजन, किरणा, बेकरी, भाजीपाला, फळ विक्री सुरू ठेवली आहे. घराबाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. हे निर्बंध म्हणजे व्यापाऱ्यांशी खेळ आहे. कोल्हापूर, इचलकरंजी, जयसिंगपूरमधील बाजारपेठा सुरू होत्या. सांगलीतील हरभट रोड, मारुती रोड, कापडपेठ या तीन रस्त्यावरील दुकाने बंद होती. विश्रामबाग, शंभरफुटी रस्त्यावरील अनेक रिटेल दुकाने सुरू होती. मग या तीन रस्त्यावरील किरकोळ व्यापाऱ्यांनी काय घोडे मारले आहे? असा सवालही त्यांनी केला.
गुढी पाडव्यादिवशी महापौर, आयुक्तांच्या परवानगीने पूजेसाठी काही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. व्यापारी वर्ग अडचणीत असताना सहानुभूती दाखविण्याऐवजी गुन्हेगारांसारखी वागणूक देण्यात आली. किमान महामारीच्या काळात तरी प्रशासनाने गुन्हे दाखल करू नये. सध्या दाखल केलेले गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
चौकट
मदनभाऊंची आठवण
सांगलीच्या आमदारांनी व्यापार सुरू ठेवण्यासाठी मोर्चा काढला. व्यापाऱ्यांची तीव्र भावना प्रशासनासमोर मांडल्या. पण नंतर पुढे काय? अशावेळी व्यापारी वर्गाला माजी मंत्री मदन पाटील यांची आठवण येते. अडचणीच्या काळात ते निश्चितच व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहिले असते, असेही शहा म्हणाले.