सांगली : महापालिकेने एलबीटी न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी आता कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कर बुडविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांची झाडाझडती घेण्याचे नियोजन महापालिकेने सुरू केले आहे. यासाठी विक्रीकर कार्यालयाकडून मंगळवारी माहिती मागविण्यात आली. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील अनेक व्यापाऱ्यांनी एलबीटी भरण्यास नकार दिला आहे. करावरील या बहिष्कारामुळे महापालिकेची आर्थिक कोंडी झाली आहे. आयुक्त अजिज कारचे यांनी व्यापाऱ्यांना वारंवार कर भरण्याचे आवाहन केले होते. मुदत देऊनही कर भरणा होत नसल्याने आता आयुक्तांनी कायद्यातील तरतुदीद्वारे कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. एलबीटी विभागामार्फत गत आठवड्यात १६ व्यापाऱ्यांवर फौजदारी दाखल करण्यात आली आहे. आणखी ४० व्यापाऱ्यांवरही फौजदारी दाखल केली जाणार आहे. त्याची तयारी सुरू आहे. त्यातच आता कर न भरणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांची झाडाझडती घेण्याची तयारी प्रशासकीय स्तरावर सुरू झाली आहे. शासनाकडे १५४ व्यापाऱ्यांच्या दफ्तर तपासणीचा प्रस्ताव यापूर्वीच पाठविण्यात आला आहे. त्यास मान्यता मिळविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. त्याचवेळी कर चुकविणाऱ्या व्यापाऱ्यांच्या दुकानांवर छापे टाकण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबतचे संकेत दिले आहेत. महापालिकेने आता आक्रमक भूमिका स्वीकारल्यामुळे व्यापाऱ्यांमध्येही खळबळ माजली आहे. व्यापारी संघटनांनी यास विरोध दर्शविला असून, याविरोधात आंदोलन करण्याचाही इशारा दिला आहे. त्यामुळे व्यापारी व महापालिका प्रशासनात संघर्षाची चिन्हे दिसत आहेत. या सर्व संघर्षात महापालिका क्षेत्रातील विकासकामे ठप्प झाली असून, अधिकारी व कर्मचारीही पगारापासून वंचित आहेत. एलबीटी कायद्याअंतर्गत महापालिकेकडे ९ हजार व्यापाऱ्यांनी नोंदणी केली आहे. यातील २ हजार व्यापारीच महापालिकेकडे नियमितपणे कर भरत आहेत. अन्य व्यापाऱ्यांनी करावर बहिष्कार टाकला आहे. (प्रतिनिधी)एलबीटीची वसुली एप्रिल ४,८१,३४,०२०मे४,२१,२१,७०९जून५,७२,०८,१८१जुलै७,२५,९८,८९३आॅगस्ट५,५८,०७,०४०सप्टेंबर६,९२,६०,२६३आॅक्टोबर४,४७,५७,३७४नोव्हेंबर ५,३६,२९,०२०एकूण४४,३५,१६,५००
व्यापाऱ्यांच्या दुकानांची झाडाझडती होणार
By admin | Published: December 09, 2014 11:01 PM