सांगली : जैन धर्म हा विज्ञाननिष्ठ धर्म आहे. या धर्माने जगाला अहिंसा, शांती, त्यागाचा संदेश दिला. जैन तत्त्वज्ञानाचे मूलतत्त्वच मानवकल्याण आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी श्रवणबेळगोळ येथे केले.श्रवणबेळगोळ (कर्नाटक) येथील भगवान बाहुबली महामस्तकाभिषेक महोत्सवाच्या नवव्या दिवशी राजनाथ सिंह यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या हस्ते धर्मध्वजाचे उद््घाटन करण्यात आले. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार, खा. अजय संचेती, आ. एम. ए. गोपाळस्वामी, कर्नाटक सरकारने स्थापन केलेल्या महामस्तकाभिषेक महोत्सव समितीचे सहअध्यक्ष के. अभयचंद्र जैन उपस्थित होते. चारुकीर्ती भट्टारक स्वामी यांच्याहस्ते चांदीचा कलश देऊन राजनाथ सिंह यांचा सत्कार करण्यात आला. राजनाथ सिंह म्हणाले की, भारतीय संस्कृतीतील जैन धर्म हा अनमोल रत्न आहे. आज जगात सर्वत्र स्पर्धा, हिंसेचे वातावरण आहे. त्यातून जैन धर्माचे तत्त्वज्ञानच जगाची सुटका करेल. जैन धर्माने मानव कल्याणाचा विचार ठेवला आहे. अहिंसा, शांती, त्याग ही तत्त्वेच जैन धर्माचा पाया आहेत. हा धर्म पूर्णपणे विज्ञाननिष्ठ आहे. भगवान बाहुबलींनीही शांती, सदभावनेचा संदेश दिला होता. सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली, हे माझे भाग्य आहे, असेही त्यांनी सांगितले.श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र घोषित करा - वर्धमानसागरश्रवणबेळगोळ येथून भगवान बाहुबलींच्या अहिंसा, त्याग या संदेशाचा प्रसार जगभर होत आहे. त्यामुळे श्रवणबेळगोळला अहिंसा क्षेत्र म्हणून घोषित करावे. भगवान महावीर यांची जन्मभूमी असलेल्या वैशाली (बिहार) येथील जैन मंदिरातून त्यांची मूर्ती चोरीला गेली आहे. त्याचाही शोध घ्यावा, अशी मागणी आचार्य वर्धमानसागर महाराज यांनी राजनाथ सिंह यांच्याकडे केली.चारुकीर्ती महाराज यांनी ताजमहालप्रमाणे भगवान बाहुबलींच्या मूर्तीलाही केंद्र शासनाने संरक्षण पुरवावे, अशी मागणी केली. या मागण्यांवर निश्चित विचार करण्याची ग्वाही राजनाथ सिंह यांनी दिली.
जैन तत्त्वज्ञानात मानवकल्याणाचा संदेश : राजनाथ सिंह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 3:07 AM