लोकमत न्यूज नेटवर्कवाठार स्टेशन : पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करणाऱ्या समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व्यसनमुक्त चळवळीचे सर्वेसर्वा बंडातात्या कराडकर यांच्या संकल्पनेतून २७ मे रोजी फलटण तालुक्यातील पिंप्रद या ठिकाणी एक आगळा वेगळा विवाह सोहळा होत आहे. याला कारणही तसेच आहे. या सोहळ्याच्या लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत मिशन’सह ‘बेटी बचाओ’चा संदेश देण्यात आला आहे. समाजात जनजागृती करणारी ही लग्नपत्रिका सर्वांच्याच कुतूहलाची विषय ठरली आहे.कोरेगाव तालुक्यातील सोळशी गावचे महादेव यादव यांचे चिरंजीव मिलिंद व हिंगणी, (ता. माण) येथील विठ्ठल शेलार यांची कन्या राधिका यांचा विवाह २७ मे रोजी पिंप्रद येथे बंडातात्या कराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व्यसनमुक्त युवा शिबिरात होत आहे. आत्ता पर्यंतच्या अनेक लग्नसोहळ्याला फाटा देत होत असलेला हा विवाह अनेकांना प्रेरणादायी ठरणार आहे. या विवाहाची निमंत्रण पत्रिकाच मुळात अनेक प्रकारच्या संदेशांनी बहरली आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’ पासून या पत्रिकेत बेटी बचाओ देश बचाओ’, ‘सर्व शिक्षा अभियान’, ‘डिजिटल साक्षरता अभियान’, ‘झाडे लावा झाडे जगवा’, ‘मेक इन इंडिया’ अशा गोष्टींना प्राधान्य देवून शासनाच्या धोरणांची जनजागृती करण्यात आली आहे.लग्न सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्चाला फाटा देत शासकीय धोरण योजनांचा संदेश आपल्या मुलाच्या लग्नपत्रिकेतून देण्याचे काम बंडातात्या कराडकर यांच्या सोबत काम करणाऱ्या महादेव यादव यांनी दिला आहे. विशेष म्हणजे त्यांची सोयरीकही त्यांच्याच विचारांच्या कार्यकर्त्याची असल्यामुळे या कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले आहे. या शिवाय ‘जात पातीचे बंधन तोडा, भारत जोडा असा संदेशही या पत्रिकेच्या माध्यमातून देण्यात आला आहे. ही अनोखी पत्रिका सर्वांच्या कुतूहलाची विषय ठरली आहे.
लग्नपत्रिकेतून ‘स्वच्छ भारत मिशन’ अन् ‘बेटी बचाओ’चा संदेश
By admin | Published: May 17, 2017 11:15 PM