मिरज : लोकसभा निवडणुकीसाठी मिरजेत सरासरी सुमारे ६५ टक्के मतदान झाले. किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. माणिकनगर येथे मतदान केंद्रावर महापौर संगीता खोत यांच्या, कमळाचे चिन्ह असलेल्या साडीला काँग्रेस कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतल्याने वादावादीचा प्रकार घडला. याबाबत तक्रारीवरून महापौरांविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.मिरजेत मंगळवार, दि. २३ रोजी सकाळी मतदानास प्रारंभ झाल्यानंतर मतदान केंद्रांवर मतदानासाठी रांगा लागल्या होत्या. सर्वच पक्षांच्या उमेदवारांकडून मतदारांना आणण्यासाठी वाहनांचा वापर सुरू होता. दुपारी बारा वाजेपर्यंत २५, तर दुपारी तीन वाजेपर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. दुपारी उन्हाच्या तीव्रतेमुळे काही ठिकाणी मतदान केंद्रे ओस पडली होती. सायंकाळी पाचनंतर अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.मिरज हायस्कूल व गोल्डन हायस्कूल येथील मतदान केंद्रांवर मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही वेळ मतदान थांबले होते. गोल्डन इंग्लिश स्कूलमध्ये मतदान यंत्रात बिघाडाच्या तक्रारीमुळे माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी मतदान अधिकाऱ्यांना जाब विचारला. तक्रारीमुळे मतदान यंत्र बदलण्यात आल्यानंतर सुमारे एक तासाच्या विलंबाने पुन्हा मतदान सुरू झाले. मिरज हायस्कूल येथे मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट बंद पडल्याने मतदारांनी आक्षेप घेतला. ब्राह्मणपुरीतील शाळा क्रमांक एकमधील मतदान केंद्रावर बोगस मतदानाच्या तक्रारीमुळे गोंधळ उडाला होता. किल्ला भागात आदर्श विद्यालयात गुलाबी मतदान केंद्राचे सुशोभिकरण करण्यात आले होते. महिला, तरुण, वृध्द, दिव्यांगांसह रुग्णांनीही मतदान केले. शहरात गुरुवार पेठ, बुधवार पेठ, मुजावर गल्ली परिसरातील मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा होत्या.माणिकनगर येथे मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेल्या महापौर संगीता खोत या कमळ चिन्हाची साडी परिधान करून आल्याने, काँग्रेसचे अय्याज नायकवडी, हरुण खतीब व कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. त्यावर, साडीवर निवडणूक चिन्ह नसून, डिझाईन असल्याचे महापौरांनी सांगितल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत त्यांची वादावादी झाली. मिरजेत मतदान केंद्राच्या पाहणीसाठी आलेले विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुहास वारके यांच्याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांनी तक्रार केल्यानंतर, त्यांनी याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.याप्रकरणी गांधी चौक पोलिसात महापौर संगीता खोत यांच्याविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, शहरातील संवेदनशील मतदान केंद्रांवर प्रशासनाकडून जादा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.मतदान यंत्र बंद पडल्यामुळे डोकेदुखीमिरज पूर्व भागातही अनेक गावात चुरशीने मतदान झाले. मल्लेवाडीत मतदान केंद्रावर मतदान यंत्र बंद पडल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया थांबविण्यात आली. या केंद्रावर पोलीस कर्मचारी व कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. रसूलवाडी व सलगरे येथे मतदान यंत्र सुरूच झाले नसल्याने मतदानास विलंब झाला. पर्यायी मतदान यंत्र आणल्यानंतर मतदान सुरू झाले. खंडेराजुरीतही मतदान यंत्र बंद पडले. गुंडेवाडीत व्हीव्हीपॅट बंद पडल्याने काही काळ मतदान थांबले होते.अधिकारी धारेवरदिव्यांग व आजारी मतदारांची ने-आण करण्यासाठी आयएमएने व्हीलचेअर दिल्या होत्या. मात्र अनेक मतदान केंद्रांवर या व्हीलचेअर पोहोचल्याच नसल्याने, दिव्यांग मतदारांची गैरसोय झाली. गोल्डन इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर दिव्यांगांसाठी व्हीलचेअर नसल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मतदान अधिकाऱ्यांना धारेवर धरले. महापालिका वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहिणी कुलकर्णी यांनी दिव्यांग मतदारांची व्यवस्था केली.
मिरज शहरात महापौरांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 11:35 PM