लोकमत न्यूज नेटवर्क
तांदूळवाडी : कुंडलवाडी (ता. वाळवा) येथे शेतकऱ्यांच्या दुसऱ्या पिढीतील मुलांकडून शेतातील कामे करण्यासाठी परंपरागत अशा पावणेर पद्धतीचा अवलंब केला जात आहे. ‘एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ’ या उक्तीनुसार एकमेकांच्या मदतीने परस्पराच्या शेतातील कामे केली जात आहेत. शेतातील टोकणी व उसाच्या लागणीची कामे या पावणेरमुळे कौतुकाचा विषय ठरली आहेत.
सध्या कोरोनामुळे सगळेच जनजीवन ठप्प झाले आहे. या परिसरातील बहुतांश युवा पिढी किणी-वाठारपासून कोल्हापूरपर्यंत पसरलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये कामास जाते. मात्र कोरोनामुळे औद्योगिक वसाहतीमधील निम्म्याहून जास्त कारखाने बंद असल्यामुळे सध्या हे युवक घरीच ठाण मांडून आहेत. आता खरीप पेरणीचा हंगाम सुरू असल्याने आपला वेळ शेतीसाठी देण्याची मानसिकता या युवकांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच लुप्त होत चाललेली पावणेरची पद्धत पुन्हा एकदा परत आल्याचे दिसत आहे.
कुंडलवाडी हे गाव वारणा नदीपासून जवळच आहे. त्यामुळे येथील शेतकरी सधन मानले जातात. पाण्यामुळे येथील बऱ्याच शेतकऱ्यांनी शेतातील कामे, पेरणी, टोकणी, उसाच्या लागणी पूर्ण केल्या होत्या. मात्र ज्या जमिनी कोरडवाहू आहेत, ते शेतकरी मान्सूनच्या आगमनाची प्रतीक्षा करतात. जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठीची लगबग वाढली होती.
खरीप पेरणी आणि उसाच्या लागणीसाठी शेतमजुरांची आवश्यकता असते. मात्र अलीकडे मजुरांची वाणवा भासत आहे. ही अडचण ओळखून काम बंद असल्याने घरी थांबून राहिलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी एकत्र येत एकमेकांना मदत करण्याच्या उद्देशाने पेरणीसह उसाच्या लागणीची कामे उरकून घेण्याला प्राधान्य दिले आहे.