मिरज : पाऊस सुरू झाल्याने तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी आॅक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.
मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पाणीटंचाईमुळे गतवर्षी आॅक्टोबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यात सुमारे ७५ पंपांव्दारे उपसा करून जतपर्यंत पाणी पोहोचविण्यात आले.मार्च महिन्यात मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी आवर्तन बंद ठेवण्यात आले.
२ एप्रिलपासून पुन्हा आवर्तन सुरू असून, मुख्य कालव्यातून जतला विसर्ग सुरू आहे. पोटकालव्यासह डोंगरवाडी, गव्हाण यासह सिंचन योजना सुरू आहेत. ऐन उन्हाळ्यात तीन तालुक्यातील १६४ गावांतील तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली.आठ कोटी : भरावे लागणारआठ महिन्यांचे सुमारे ४० कोटी रूपये विजबिल असून, यापैकी १९ टक्के म्हणजे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन टप्प्यात आठ महिने आवर्तन सुरू ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून, जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात आवर्तन बंद होणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.