मिरज : म्हैसाळ (ता. मिरज) येथील सामूहिक हत्याकांडप्रकरणी अटकेत असलेला मांत्रिक अब्बास मोहंमदअली बागवान याला शुक्रवारी सोलापूर येथे नेऊन त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी तंत्र-मंत्रासाठी वापरण्यात येणारे काही साहित्यही जप्त करण्यात आले. हत्याकांडानंतर बागवान हा म्हैसाळमधून सोलापूरला कसा गेला, तो कुठे थांबला होता, याचीही माहिती त्याच्याकडून घेण्यात आली.
म्हैसाळ येथील डाॅ. वनमोरे कुटुंबातील ९ जणांच्या सामूहिक हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार मांत्रिक आब्बास मोहंमदअली बागवान यास न्यायालयाने नऊ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मिरज ग्रामीण पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करीत आहेत. वनमोरे कुटुंबीयांचे हत्याकांड पूर्वनियोजित असल्याचे चाैकशीत निष्पन्न होत आहे.
हत्याकांडाच्या चौकशीसाठी मांत्रिक बागवान याला शनिवारी सोलापुरातील बाशा पेठ येथे तो राहात असलेल्या घरी नेण्यात आले. मांत्रिक बागवान आणि त्याचे अन्य नातेवाईक या घरात भाड्याने राहतात. या मांत्रिकाच्या अटकेनंतर त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून गायब झाले आहेत. पोलिसांनी बागवान याचे घर उघडून घरझडती घेतली. यावेळी मंत्र - तंत्रासाठी वापरण्यात येणाऱ्या काही संशयास्पद वस्तू जप्त केल्याची माहिती मिळाली. मात्र, मांत्रिकाच्या घरी नेमके काय सापडले, याबाबत माहिती पोलिसांनी दिली नाही.