मिरज : रब्बी हंगामासाठी म्हैसाळ योजनेचे सुरू करण्यात आलेले चार पंप विद्युत बिलाच्या थकबाकीमुळे बंद करण्यात आले. आज दुपारी लगेचच म्हैसाळ योजनेचे पंप सुरू होताच १ कोटी ६७ लाख रुपये वीज बिलाच्या थकबाकीपोटी महावितरणने विद्युतपुरवठा खंडित केला. वीज बिलाच्या थकबाकीमुळे म्हैसाळ योजनेचे रब्बी आवर्तन धोक्यात आले आहे.म्हैसाळ प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १५ आॅक्टोबर ते २८ फेबु्रवारीपर्यंत रब्बी आवर्तनाचे नियोजन केले होते. शेतकऱ्यांनी मागणी नोंदविली नसली तरी, मुख्य कालव्यात पाणी सोडण्यासाठी पहिल्या टप्प्यातील चार पंप सुरू करण्यात आल्याची माहिती मिळताच दोन तासातच महावितरणचे अधिकारी तेथे दाखल झाले. टंचाई काळात म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी वापरण्यात आलेल्या विजेच्या बिलाची १ कोटी ६७ लाख थकबाकी भरण्यात आली नसल्याने म्हैसाळ पंपगृहाचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. विजेचे थकित बिल भरण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी वसूल करण्याचे शासनाचे आदेश असल्याने शेतकऱ्यांकडून थकित वीज बिलाची रक्कम वसूल करूनच विद्युतपुरवठा सुरू करावा लागणार असल्याचे कार्यकारी अभियंता महादेव घुळे यांनी सांगितले. खंडित विद्युत पुरवठ्यामुळे रब्बी हंगामात म्हैसाळचे पाणी बंद राहिल्यास मिरज पूर्व भागातील गावांसह जत, कवठेमहांकाळ तालुक्यातील शेतकऱ्यांना फटका बसणार आहे. पाण्यासाठी पाटबंधारे विभागाने रब्बीची दोन आवर्तने त्यानंतर उन्हाळी हंगामात दोन टप्प्यात पाणी सोडण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार शेतकऱ्यांना पाण्याची मागणी नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले होते. मात्र थकबाकीमुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्याने योजनेतून पाणी सुटणार की नाही, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. आर. आर. पाटील यांच्या भूमिकेकडे लक्षमाजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी यापूर्वी वारंवार टंचाई निधीतून वीज बिलाची व्यवस्था करून म्हैसाळ कालव्यात पाणी सोडण्यास भाग पाडले होते. विधानसभा निवडणुकीनंतर आर. आर. पाटील यांनी म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्याची मागणी केली. मात्र म्हैसाळचे पंप सुरू झाल्यानंतर लगेचच बंद करण्यात आल्याने आर. आर. कोणती भूमिका घेतात, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.(वार्ताहर)
‘म्हैसाळ’ची वीज तोडली
By admin | Published: November 02, 2014 12:34 AM