शरद जाधव -- सांगली --वीस कोटींवर जाऊन पोहोचलेली थकबाकी आणि वसुलीस शेतकऱ्यांकडून मिळणाऱ्या शून्य टक्के प्रतिसादामुळे म्हैसाळ योजना पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. थकबाकीच्या वसुलीसाठी पाटबंधारे प्रशासन ठाम असताना, शेतकरी मात्र, योजनेला आणखी कोणते ‘पॅकेज’ मिळते का, या प्रतीक्षेत आहेत. या साऱ्या घडामोडीत वीज बिल भरल्याशिवाय ‘म्हैसाळ’ची वीज जोडण्यास ‘महावितरण’ने नकार दिल्याने म्हैसाळ योजना दुहेरी कात्रीत सापडली आहे. म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींनीच आता आवर्तनासाठी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. मिरज पूर्व भाग, कवठेमहांकाळ, तासगाव आणि जत तालुक्याच्या काही भागाला म्हैसाळ योजनेचे पाणी संजीवनी ठरत असताना, वाढत चाललेल्या थकबाकीच्या आकड्यामुळे योजना सातत्याने संकटात सापडत चालली आहे. योजनेची गेल्या तीन वर्षात झालेली आवर्तने केवळ राजकीय दबावाखालीच झाल्याने, आता पाणी पाहिजे असेल तर सर्वप्रथम मागणी अर्ज आणि थकबाकी भरण्यासाठी शेतकऱ्यांना झेपेल एवढी रक्कम भरण्याचे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. त्यातही आवर्तन सुरू करायचे असेल, तर पाणी मागणी अर्ज भरून देणे आवश्यक असल्याचे विभागाने जाहीर प्रकटनातून सांगितले असले तरी, शेतकऱ्यांकडून मात्र, यास काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सध्या म्हैसाळ योजनेतून पाणी सुरु होणे या भागासाठी गरजेचे बनले आहे. या भागात ऐन थंडीतच पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. योजनेच्या पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या द्राक्ष क्षेत्राचाही आता हंगाम तेजीत असून पुढील महिन्यात बाजारात येणाऱ्या द्राक्षांसाठी पाणी मिळणे गरजेचे असल्याने अनेक बागायतदार योजना कधी सुरु होते, याकडे लक्ष ठेवून आहेत. यंदा मान्सूनमध्ये कुठेही समाधानकारक पाऊस न झाल्याने या चार तालुक्यातील जलस्रोतही आटल्याने आता म्हैसाळच्या भरवशावरच या भागातील शेतकरी असताना, आवर्तनाला थकबाकीचा ‘ब्रेक’ लागला आहे. पाटबंधारे विभागाकडून थकबाकी वसुलीसाठी महसूलच्या मदतीने शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी चढविण्याची मोहीम सुरूच आहे. मिरज तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सात-बारावर थकबाकी वळती करण्यात आल्याने शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. योजनेची थकबाकी भरण्यास शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेत, म्हैसाळच्या लाभक्षेत्रातील साखर कारखान्यांच्या प्रमुखांची बैठक घेऊन, ताकारी योजनेची बिले ज्यापध्दतीने त्या भागातील दोन कारखाने शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून वळती करतात, त्यापध्दतीने सहकार्याचे आवाहन केले होते. वसंतदादा कारखान्याने त्यास प्रतिसाद दिला नव्हता. मात्र, इतर कारखान्यांनी बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला असला तरी, ही बैठक होऊन आठवडा उलटला तरी प्रत्यक्षात कार्यवाही होत नसल्याने, कारखान्यांनीही बिलाच्या वसुलीस टाळाटाळ सुरू केल्याचे चित्र आहे. पाटबंधारे प्रशासनाने गेल्या आठवड्यात प्रसिध्द केलेल्या जाहीर प्रकटनात, किमान ५० टक्के मागणी अर्ज आल्याशिवाय योजना सुरू होणार नसल्याचे संकेत दिले होते. त्याबरोबरच ५० टक्के आगाऊ रक्कम भरण्याचे फर्मान पाटबंधारे प्रशासनाने सोडल्याची चर्चा शेतकऱ्यांत आहे. मात्र, अशा आशयाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. म्हैसाळ योजनेतून पाणी सुरु व्हावे यासाठी पाटबंधारे प्रशासनाकडून जाहीर प्रकटन देऊन तयारी केली आहे. शेतकऱ्यांकडून मात्र, पाणी मागणी अर्ज भरुन देण्यासही प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांनी मागणी अर्ज भरुन द्यावेत, आवर्तनासाठी त्याचा फायदा होणार आहे. पाणी सोडण्याअगोदर पन्नास टक्के रक्कम भरावी, असा कोणताही आदेश विभागाने काढलेला नसून, शेतकऱ्यांनी थकबाकी वसुलीसाठी प्रतिसाद दिल्यास योजनेचे आवर्तन सुरु होऊ शकते. त्यामुळे आता ‘आपली योजना’ ही भावना ठेवून प्रतिसाद देणे आवश्यक आहे. - सूर्यकांत नलावडे, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे घोरपडेंची उणीव जाणवू लागली म्हैसाळ योजनेचे रखडलेले काम मार्गी लावण्यात महत्त्वाची भूमिका बजाविलेले माजी मंत्री अजितराव घोरपडे हे गेल्या काही दिवसांपासून अलिप्त आहेत. मतदारसंघाचे पंधरा वर्षे प्रतिनिधीत्व केल्याने घोरपडे यांना मतदारसंघाची जाण आहे. पूर्व भागात आजही त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो. अशा परिस्थितीत त्यांनी आवर्तनासाठी आवाहन केले असते, तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असता. सर्वमान्य तोडगा काढण्यात ते तरबेज असले तरी, त्यांची भूमिका गुलदस्त्यातच राहिल्याने योजना अडचणीत सापडली आहे. लोकप्रतिनिधींचा लागणार कसथोड्याफार संघर्षानंतर योजनेतून पाणी सुरू होणार, या आशेवर असलेल्या या भागातील शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून देण्यासही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे थकबाकी भरल्याशिवाय योजना सुरू होणार नाही, असे आवाहन करणाऱ्या खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांना शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. त्यात कवठेमहांकाळच्या आमदार सुमनताई पाटील यांनी, पाणी सोडण्यासाठी आंदोलनाचा इशारा दिल्याने ‘म्हैसाळ’च्या लाभक्षेत्रातील लोकप्रतिनिधींचा, योजना सुरु करताना कस लागणार आहे. ‘ताकारी’चे नियोजन पक्के, ‘म्हैसाळ’ला बसताहेत धक्केथकबाकीच्या वाढत्या आकड्यांमुळे अडचणीत सापडलेल्या म्हैसाळ योजनेचे सध्याचे भवितव्य अधांतरी बनले आहे. याचवेळी जिल्ह्यातीलच ताकारी योजनेच्या आवर्तनाचे नियोजन मात्र सुरळीत असून, दोन साखर कारखान्यांनी पाणीबिल शेतकऱ्यांच्या बिलातून घेत योजना सुरळीत चालू ठेवली आहे. ‘ताकारी’प्रमाणेच ‘म्हैसाळ’च्या थकबाकीसाठी कारखान्यांनी पुढाकार न घेतल्याने म्हैसाळ योजना थकबाकीच्या फेऱ्यात पुरती अडकल्याचे चित्र आहे.
म्हैसाळ योजना अडकली दुहेरी कात्रीत
By admin | Published: December 14, 2015 11:52 PM