कवठेमहांकाळ : गेली वीस वर्षे म्हैसाळच्या पाण्याची प्रतीक्षा करणाऱ्या रांजणीसह पाच गावांची प्रतीक्षा अखेर आज (बुधवारी) पूर्ण झालीे. रांजणीच्या कालव्यामध्ये आज पाणी सोडण्यात आले अन् शेतकऱ्यांनी एकच जल्लोष केला. या पाण्याचे पूजन महांकाली कारखान्याचे अध्यक्ष विजय सगरे यांच्याहस्ते करण्यात आले. रांजणी, अलकूड (एस), अग्रण धुळगाव, लोणारवाडी, पिंपळवाडी या गावांतील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रांजणी परिसराला म्हैसाळ योजनेचे पाणी द्यावे, अशी मागणी आमदार आर आर. पाटील यांच्याकडे केली होती. यानंतर त्यांनी या गावासाठी वेगळा कालवा मंजूर करून घेतला. परंतु नांगोळे येथे काही शेतकऱ्यांनी या कालव्याचे काम बंद पाडले होते. यावर आर. आर. पाटील यांनी मध्यस्थी करून या शेतकऱ्यांची समजूत काढली व काम सुरू केले. सहा महिन्यांत गतीने हे काम करण्यात आले. आज सकाळी रांजणी फाटा येथे विजय सगरे, बांधकाम सभापती गजानन कोठावळे यांच्याहस्ते कालव्यामध्ये पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष हायूमभाई सावनूरकर, दत्ताजीराव पाटील, पिंटू कोळेकर, दीपकराव ओलेकर, नारायण पवार, दिलीप ओलेकर, जीवनराव भोसले, संतोष पवार, रांजणीच्या सरपंच सुनीता साळुंखे, पतंगराव यमगर, उपसरपंच पांडुरंग कोळेकर आदींसह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते. रांजणी कालव्यात पाणी सोडावे, या मागणीचे निवेदन मंगळवारी सुरेश पाटील, विजय सगरे यांनी कवठेमहांकाळचे तहसीलदार सचिन डोंगरे यांना देण्यात आले होते. यानंतर डोंगरे यांनी कार्यकारी अभियंता एम. एस. धुळे यांना पाणी सोडण्याबाबत सांगितले. त्यानंतर पाणी सोडण्यात आले. (वार्ताहर)
‘म्हैसाळ’चे पाणी रांजणीत दाखल
By admin | Published: January 14, 2015 10:29 PM