लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कामगारांच्या आरोग्यासाठी व कष्ट करण्याची ऊर्जा मिळवून देण्यासाठी शासनाच्या कामगार विभागाने मध्यान्ह भोजन ही संकल्पना अमलात आणली आहे, असे मत जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी रविवारी व्यक्त केले.
सांगलीत धामणी रोड येथे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजनेचा प्रारंभ झाला. यावेळी ग्रामविकास व कामगारमंत्री हसन मुश्रीफ, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, पुणे विभागाचे अप्पर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, सांगली व इचलकरंजीचे सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव, संजय बजाज, क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, रवींद्र खिलारे, आदी उपस्थित होते.
जयंत पाटील म्हणाले की, ज्यांचे हातावरचे पोट आहे, अशा कामगारांच्या संकटाच्या काळात, त्यांचा दुर्दैवाने अपघात झाल्यास किंवा कोणताही दुर्धर आजार झाल्यास त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी कामगार विभागामार्फत कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. गरिबांची मुले शिकली, मोठी झाली, उच्चविद्याविभूषित झाली तर त्यांचे जीवनमान उंचावेल. कष्टकरी कामगारांच्या मुलांना शिक्षणात मदत करणे व त्यांसाठी आर्थिक व्यवस्था करणे हा दृष्टिकोन या मंडळामार्फत ठेवण्यात आला आहे.
हसन मुश्रीफ म्हणाले, राज्यामध्ये मंडळामार्फत प्रत्येक जिल्ह्यामध्ये बांधकाम कामागार मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे. कोरोनाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार राज्याबाहेर गेले, त्यामुळे फार मोठा परिणाम या बांधकाम व्यवसायावर झाला. त्यावेळी राज्यातील थांबलेल्या कामगारांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे शासनाकडून मोठ्या शहरामध्ये ही योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी आपली ऑनलाईन नोंदणी तत्काळ करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जयंत पाटील व हसन मुश्रीफ यांच्या हस्ते बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत विविध लाभ मिळालेल्या कामगारांना धनादेशांचे वाटप करण्यात आले.