लोकमत न्यूज नेटवर्ककडेगाव : मी उद्योगमंत्री असताना, जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राचा विकास व्हावा यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय सांगली येथे आणले आहे. हे कार्यालय सोलापूरला पळविण्याचा पालकमंत्री सुभाष देशमुख यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला आहे. मी थेट उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशीही बोललो आहे. त्यांनी कार्यालयाचे स्थलांतर होणार नाही, असे स्पष्ट केले आहे, अशी माहिती माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी बुधवारी दिली.
कदम म्हणाले की, सांगली जिल्हा औद्योगिक क्षेत्र वाढीला गती देणारे सांगली येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे कार्यालय सोलापूरला हलविण्यासाठी पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना पत्र दिले होते. परंतु सुभाष देसाई यांनी, सांगलीतील या कार्यालयाचे स्थलांतर होणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे याबाबत देसाई यांच्यासोबत पालकमंत्र्यांनी आयोजित केलेली बैठक रद्द केली आहे. जिल्ह्यातील उद्योजकांसह अनेक नेत्यांनीही या स्थलांतराच्या प्रयत्नाला विरोध केला आहे. जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हे कार्यालय सांगलीतच राहणे गरजेचे आहे.
मी उद्योगमंत्री असताना १८ जानेवारी २००० रोजी या कार्यालयाचे उद्घाटन झाले. त्यावेळी तत्कालीन ग्रामविकासमंत्री आर. आर. पाटील, तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील, तत्कालीन समाजकल्याणमंत्री जयवंतराव आवळे, तत्कालीन उद्योग राज्यमंत्री जयदत्त क्षीरसागर उपस्थित होते. हे कार्यालय जिल्ह्यातील उद्योजकांसाठी सोयीचे आहे. याशिवाय जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राला चालना मिळण्यासाठी जिल्ह्यातच हे कार्यालय आवश्यक आहे. या कार्यालयाच्या स्थलांतराचा प्रयत्न पालकमंत्र्यांनी करू नये.पालकमंत्र्यांना जिल्हा बंदीचा शिवसेनेचा इशारालोकमत न्यूज नेटवर्कसांगली : सुभाष देशमुख हे जिल्ह्याचे पालकमंत्री असले तरी, त्यांनी मालक असल्यासारखे वागू नये. एमआयडीसी कार्यालय स्थलांतराचा प्रयत्न थांबवावा, अन्यथा त्यांना जिल्ह्यात प्रवेशबंदी करू, असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिला.विभुते म्हणाले की, सांगली जिल्ह्यामध्ये तेरा औद्योगिक वसाहती आहेत. येथे हजारो लोकांना रोजगार मिळतो. येथील उद्योगधंदे सोलापूरला स्थलांतरित व्हावेत, या उद्देशाने देशमुख येथील एमआयडीसीचे विभागीय कार्यालय स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत उद्योजक व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंगळवारी मुंबईत बैठक झाली आहे. देसाई यांनी सांगलीतील कार्यालय स्थलांतरास स्पष्टपणे नकार दर्शविला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला खीळ घालण्याचा उद्योग आता देशमुख यांनी थांबवावा, अन्यथा त्यांना जिल्ह्यात फिरू दिले जाणार नाही. ते पालकमंत्री आहेत, मालकमंत्री नव्हेत.
कृष्णा व्हॅली चेंबरचे कुटुंबप्रमुख शिवाजी पाटील म्हणाले, येथील कार्यालय स्थलांतराचा प्रयत्न निषेधार्ह आहे. सांगली जिल्ह्यातून चार नियोजित राज्य व राष्ट्रीय महामार्ग जाणार आहेत. येथे पायाभूत सुविधा आहेत. उद्योगवाढीसाठी पोषक वातावरण आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीच्या अंतर्गत रस्त्यासाठी कोट्यवधी रुपये दिले आहेत.
यावेळी रावसाहेब घेवारे, युवा सेनेचे जिल्हाप्रमुख शंभुराज काटकर, सांगली शहरप्रमुख मयूर घोडके, कुपवाड शहरप्रमुख अमोल पाटील, चंद्रकांत मैबुरे, ओंकार जोशी, श्रीकांत माने, महादेव हुलवान, तानाजी जाधव आदी उपस्थित होते.वेठीस धरण्याचा प्रयत्नपर्यावरणाच्या नावाखाली औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना वेठीस धरले जात आहे. त्यासाठी जवळच्या काही ग्रामपंचायतींना न्यायालयात जाण्यास काही विघ्नसंतोषी लोक भाग पाडत आहेत. या पार्श्वभूमीवर पर्यावरणासंदर्भातील सीईटीपी प्लँट लवकरात लवकर सुरू करण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा शिवाजी पाटील, संजय खांबे, अशोक साळवी, अतुल पाटील, गणेश निकम यांनी यावेळी व्यक्त केली.लोकमत इफेक्टएमआयडी कार्यालयाच्या स्थलांतरप्रश्नी ‘लोकमत’ने सर्वप्रथम वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर याबाबत उद्योजकांनी एकजुटीने यास विरोध केला. राजकीय पातळीवरही संताप व्यक्त झाला. उद्योगमंत्री, पालकमंत्र्यांशीही चर्चा झाल्या. स्थलांतराचा हा प्रस्ताव रद्द होण्याच्या मार्गावर आहे. बातमीच्या प्रभावाने जिल्ह्यातील उद्योजकांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.