गतवेळचा अनुभव पाहता प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार डी. एस. कुंभार, गटविकास अधिकारी आप्पासाहेब सरगर यांनी आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून महापूर परिस्थितीवर मात करण्याबाबत नियोजन केले. मिरज तालुक्यातील माळवाडी, ढवळी, पद्माळे, कर्नाळ, कसबे डिग्रज, हरिपूर, समडोळी, म्हैसाळ, जुनी धामणी, अंकली, इनाम धामणी, मौजे डिग्रज, सावळवाडी, कवठेपिरान, दुधगाव, तुंग, वड्डी, निलजी बामणी, नांद्रे या १९ गावांना महापुराचा फटका बसताे. कमी धोका असणारी तुंग, वड्डी, इनामधामणी ही तीन गावे वगळता १६ गावातील २ हजार ७५६ कुटुंबातील सुमारे ९ हजार ८५१ इतक्या लोकांना नातेवाईक, संस्था, जिल्हा परिषद शाळेत स्थलांतरित केले आहे. कुटुंबाबरोबर ३ हजार ८५१ जनावरेही सुरक्षितस्थळी हलविण्यात आली आहेत. पूरपरिस्थिती वाढल्याने आणखी काही कुटुंबाचे स्थलांतर करावे लागले. तालुका प्रशासनाच्या स्थलांतराच्या नियोजनामुळे किरकोळ अपवाद वगळता ग्रामीण भागात पूरबाधित गावात बचाव मोहीम राबवावी लागली नसल्याचे गटविकास अधिकारी सरगर यांनी सांगितले.
चौकट
नियोजनासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका
तालुक्यातील पूर ओसरल्यानंतर पूरबाधित गावात आरोग्यासह निर्माण होणाऱ्या इतर समस्या निवारणासाठी तसेच नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. यासाठी महसूल व पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्याची माहिती सरगर यांनी दिली.