ओळी - शहरातील पूरपट्ट्यातील नागरिकांनी उपायुक्त राहुल रोकडे यांनी संवाद साधला. यावेळी अशोक कुंभार, चिंतामणी कांबळे, अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील नदी, नाल्याकाठच्या लोकांनी संभाव्य पूरस्थिती येण्यापूर्वीच सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे यांनी केले. बुधवारी जामवाडी परिसरातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला.
दोन वर्षांपूर्वी सांगली शहराला महापुराचा फटका बसला होता. तब्बल एक लाख लोकांना स्थलांतरित व्हावे लागले होते. त्यामुळे यंदा महापालिकेच्यावतीने संभाव्य पूरस्थिती येण्यापूर्वीच नागरिकांना ‘सावधानतेचा इशारा’ देण्यात येत आहे. मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागांत पुराचे पाणी पहिल्यांदा येते. ऐनवेळी पाणी वाढल्याने नागरिकांचे स्थलांतर करण्यास मोठी अडचण आली होती. हा अनुभव लक्षात घेता यंदाच्या संभाव्य पूरस्थितीचा अंदाज घेता आयुक्त नितीन कापडणीस यांनी पूरपट्ट्यातील बाधित नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित होण्याबाबत सूचित करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
बुधवारी उपायुक्त राहुल रोकडे यांच्या नेतृत्वाखाली सहायक आयुक्त अशोक कुंभार, मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, धनंजय कांबळे, प्रणिल माने, वैभव कुदळे, गणेश माळी, किशोर कांबळे आदींनी मगरमच्छ कॉलनी, सूर्यवंशी प्लॉट, इनामदार प्लॉट आदी भागांत फिरून नागरिकांशी संवाद साधला तसेच योग्यवेळी स्थलांतरित व्हावे आणि पर्यायी व्यवस्था शोधावी, असे आवाहन केले.