लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज-मौजे डिग्रज परिसरात कृष्णा नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. नदीकाठावरील लोकांना स्थलांतरित केले जात आहे. कृष्णा नदीची पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीकडे वेगाने वाढत आहे. कसबे डिग्रज व मौजे डिग्रजला जोडणारा बंधारा आणि नवीन पूल दोन्हीही पाण्याखाली गेल्याने दोन्ही गावांचा संपर्क तुटला आहे.
शुक्रवारी सकाळी पाणी वाढण्यास सुरुवात झाल्याने ग्रामपंचायत प्रशासन आणि अधिकारी घरोघरी जाऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याच्या सूचना देत हाेते. हजारो लोक प्रापंचिक साहित्य व जनावरांसह बाहेर पडत आहेत.
कसबे डिग्रज ग्रामपंचायतीसमोरील खणीत पाणी आले आहे. त्यामुळे हरिजन वसाहत, कोळी वाडी, मळीवाट, ब्रह्मनाळ रस्ता भागातील २०० कुटुंबांना स्थलांतरित केले आहे. मौजे डिग्रजमधील पूरस्थिती गंभीर आहे. म्हसोबा रस्ता, लक्ष्मी वाट, कर्नाळ वाट या रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळे गावातून बाहेर जाण्यासाठी एकमेव नांद्रे रस्ता खुला आहे. पाणी वाढत राहिल्यास हा मार्गही बंद हाेणार आहे. प्रशासनाने कवलापूर व सांगली साखर कारखाना येथे स्थलांतरितांची व्यवस्था केली आहे
अप्पर तहसीलदार अर्चना पाटील यांनी पूरस्थितीची पाहणी केली. जिल्हा परिषद सदस्य विशाल चौगुले, उद्योजक भालचंद्र पाटील, सरपंच गीतांजली इरकर, मंडल अधिकारी विजय तोडकर, उपसरपंच सागर चव्हाण, सदस्य संजय शिंदे, प्रमोद चव्हाण, संजय निकम, आरिफ खाटीक यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी मदतकार्य करीत आहेत.