शरद जाधव भिलवडी : थंडीचा महिना सुरू झाला की कृष्णाकाठचे पाणवठे परराज्यातून स्थलांतरित होणाऱ्या पक्ष्यांनी फुलतात. महापुरानंतर वातावरणात झालेल्या बदलाने महिनाभर थंडी पुढे गेली, मात्र थंडीस प्रारंभ होताच तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी, असे पाणथळीचे पक्षी हजारो मैलांचा प्रवास करून कृष्णाकाठावर दाखल झाले आहेत.स्थलांतरित पक्ष्यांच्या आगमनाची उत्सुकता महाराष्ट्रातील पक्षीप्रेमींना लागलेली असते. एक महिना उशिरा का होईना, तुतवार, छोटा कंठेरी, चिखल्या, पांढरा धोबी, पिवळा धोबी, करडा धोबी या पक्ष्यांच्या जोडीने खुल्या चोचीचे करकोचे, पांढऱ्या मानेचे करकोचे, रंगीत करकोचे, गोताखोर, अवाक, चमचे, सुरय, स्थानिक स्थलांतरित पक्षीही कृष्णाकाठावर लक्ष वेधत आहेत.हिवाळ्यात ध्रुवीय प्रदेशात बर्फवृष्टीमुळे अनेक वनस्पती, कीटक बर्फाखाली गाडले जातात. परिणामी या ठिकाणाहून पक्षी अन्नाच्या शोधात सुरक्षित अशा ठिकाणांच्या शोधात कृष्णाकाठी स्थलांतरित होतात. कृष्णा नदीकाठी उसाच्या पिकात असणारे असंख्य प्रकारचे कीटक व नदीतील मासे हे या पक्ष्यांचे प्रमुख व आवडीचे अन्न आहे.
नदी पात्रात असणाऱ्या बंधाऱ्याच्या खाली पाणी कमी असल्याने कीटक, छोटे मासे असे भक्ष्य पक्ष्यांना सहज सापडते. सँन्ड पाईपर, चिखल्या, विविध प्रकारचे परीट पक्षी, नदी सुरय, टिटवी, शेकाट्या, वेडा राघू, खंड्या, रंगीत करकोचा, टिटवी, कवड्या खंड्या, पानकावळा, राखी बगळा, चक्रवाक, चमचा, मोर शराटी, चिरक किंवा काळोखी, काळ्या मानेचा शराटी, तारवाली पाकोळी, जांभळी पानकोंबडी, शेकाट्या, मुनिया आदी पक्षी येथे हमखास दिसतात.आपल्या किलबिलाटाने कृष्णाकाठावरील मगरीची झोप मोडण्याचे काम पक्षी करीत असल्याचे विलोभनीय दृश्यही अनेकदा पाहायला मिळते.