मिरज : खासगी सावकारांच्या धमक्यांमुळे रवींद्र अशोक बुरजे (वय ३३, रा. डोणगे गल्ली, मिरज) हा तरुण घरातून बेपत्ता झाल्याप्रकरणी शहर पोलिसांनी दहा खासगी सावकारांविरूध्द गुन्हा दाखल करून, सातजणांना अटक केली आहे.मार्केट परिसरात प्लास्टिक साहित्य विक्रीचा व्यवसाय करणारे रवींद्र बुरजे दि. २० रोजी बेपत्ता झाले आहेत.
कर्जापोटी घर, दुकान व गोदाम लिहून घेऊनही कर्ज वसुलीसाठी खासगी सावकारांकडून सुरू असलेल्या दमदाटीमुळे घरातून निघून जात असल्याची, रवींद्र यांनी हिून ठेवलेली चिठ्ठी सापडल्याने, याबाबत पोलिसांनी चंद्रकांत कित्तुरे, सुनील आप्पासाहेब डोणगे (४२, जैन बस्तीजवळ, पाटील हौद, मिरज), श्रीकांत धोंडीराम कदम (३८, रवींद्रनगर, कार्वेकर प्लॉट, मिरज), ज्ञानू कदम, दत्तात्रय हरिश्चंद्र राजमाने (२९, डोणगे गल्ली, मार्तंडेश्वर चौक, मिरज), जय चंदन हिप्परकर (२७, हरिपूर रस्ता, कलावती मंदिराजवळ, सांगली), संदीप बाळासाहेब गाताडे (३८, रमा उद्यान, गगनगिरीनगर, मिरज), अकबर उमर मुजावर (२९, मंगळवार पेठ, मिरज), सचिन चौगुले (चौगुले कॉम्प्युटर्स), महेश विश्वनाथ महाजन (४८, शुक्रवार पेठ, कोल्हापूर) या दहाजणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
रवींद्र यांनी व्यवसायासाठी मिरजेतील या दहाजणांकडून दहा ते पंचवीस टक्के व्याजाने कर्ज घेतले होते. सुमारे ७३ लाखांचे कर्ज घेतले होते. त्यापोटी ७५ लाख परत दिल्यानंतरही आणखी ४८ लाखाची मागणी खासगी सावकारांकडून करण्यात येत होती. भरमसाट व्याजाने घेतलेल्या कर्जामुळे व्यवसाय दिवाळखोरीत निघाला. कर्जाच्या वसुलीसाठी सर्व मालमत्ता सावकारांनी लिहून घेतली. मात्र आणखी रकमेच्या मागणीसाठी सावकारांकडून धमक्या सुरुच असल्याने, या त्रासाला कंटाळून घरातून निघून जात असल्याचे रवींद्र बुरजे यांनी चिठ्ठीत लिहिले आहे.कर्ज वसुलीसाठी धमक्या देणाऱ्या सावकारांमुळे खचलो असून, देशोधडीला लागलो असल्याचेही रवींद्र यांनी आई, वडील व पत्नीस उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
गेले दहा दिवस रवींद्र यांचा शोध लागत नसल्याने, त्यांचे वडील अशोक बुरजे यांनी चिठ्ठीत नावे असलेल्या दहाजणांविरूध्द शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सुनील डोणगे, श्रीकांत कदम, दत्तात्रय राजमाने, जय हिप्परकर, संदीप गाताडे, महेश महाजन, अकबर मुजावर या सातजणांना खासगी सावकारीप्रकरणी अटक केली आहे. बेपत्ता रवींद्र बुरजे यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.संशयित अधिकारीसावकारीप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये अभियंता, व्यापारी, औषध विक्रेते, बँक कर्मचारी यांचा समावेश आहे. महेश महाजन हा रवींद्र बुरजे याचा मेहुणा आहे.