मोहन मोहिते / वांगी ग्रामीण भागात कुटुंबाला आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी शेतीला दुग्धोत्पादनाची जोड देणारी ‘श्वेतक्रांती’ साऱ्या महाराष्ट्रभर घडून आली, मात्र, याला अपवाद ठरले आहे, कडेगाव तालुक्यातील सासपडे गाव. गेल्या चार पिढ्यांपासून या गावातील दूध उत्पादक दुधाची विक्री न करता ते घरातच वापरतात. त्यामुळे सासपडे गाव ‘गोकुळ’ बनले आहे. सांगली जिल्ह्यातील कडेगावपासून १३ किलोमीटरवर असलेले आणि नांदणी नदीकाठी वसलेले सासपडे हे पोळ भावकी मोठ्या प्रमाणात असणारे गाव. गावात दोन हजार लोकसंख्या. शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेल्या येथील शेतकऱ्यांना आता टेंभू योजनेचे पाणी मिळाल्याने हरितक्रांतीचे पर्व सुरू झाले आहे. त्यामुळे जनावरांचीही संख्या ६०० ते ७०० आहे. दुभत्या जनावरांची संख्याही मोठी असल्याने प्रतिदिन ८०० लिटर दूध उत्पादित होते. पण हे दूध विक्री न करता घरीच वापरले जाते किंवा गावातच उसनवारीने दिले जाते! चार पिढ्यांपासून घरातील जनावरांच्या दुधाची विक्रीच केली जात नसल्याने, सासपडे गाव ‘गोकुळनगरी’ म्हणून ओळखले जात आहे. दुधापासून तयार होणारे दही, लोणी, ताक, तूप यासह अन्य दुग्धजन्य पदार्थ घरीच खाण्यासाठी वापरले जातात किंवा ते पै-पाहुणे, शेजाऱ्यांना दिले जातात. पण त्यांची विक्री होत नाही. त्यामुळे गावात एकही दूध संकलन केंद्र किंवा गवळीबांधव दूध खरेदीसाठी फिरकत नाहीत! १९९५ मध्ये तत्कालीन माजी आमदार संपतराव देशमुख यांनी सासपडेत शेतीपूरक दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन, दूध विक्रीबाबतचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना बॅँकेकडून कर्ज उपलब्ध करून देऊन ५० जर्सी व होस्टन गाई खरेदी करून दिल्या. गावात दूध संकलन केंद्र सुरू केले. त्यावेळी प्रतिदिन सुमारे २५० ते ३०० लिटर दूध संकलन होत होते. मात्र, काही दिवसातच यातील काही गार्इंचा मृत्यू झाला, तर बऱ्याच गाई वांझ राहिल्या. दुधाची विक्री केल्यानेच देवीचा कोप झाल्याचा गावकऱ्यांचा समज झाला आणि त्यांनी पुन्हा दूध विक्रीचा नादच सोडला. देवीचा कोप की मल्लांची परंपरा?प्रस्तुत प्रतिनिधीने गावातील जुन्या-जाणत्या मंडळींना विचारले असता, काहींनी सांगितले की, पूर्वी डोंगराई देवीच्या महिला भक्ताने दुधाची विक्री न करता ते गावातच व कुटुंबातच वापरले जाईल, असे वचन दिले होते. त्यामुळे दुधाची विक्री होत नाही. काही जाणकारांनी सांगितले की, पूर्वी गावात पैलवानांची संख्या मोठी होती. गावात खाशाबा कृष्णा पोळ, गणपत ज्ञानू पोळ, गजेराव पोळ आदी नामवंत मल्ल होऊन गेले. या गावाला मल्लांचा वारसा आहे. त्यामुळे पूर्वीपासून दुधाचा वापर घरातच व्हावा यासाठी दूध विक्री न करण्याचा निर्णय जुन्या पिढीतील लोकांनी घेतला असावा. ‘कामधेनू दत्तक’चे गाव याबाबत पशुधन विकास अधिकारी डॉ. ऋषिकेश शिंदे म्हणाले की, हे गाव जिल्हा परिषदेच्या कामधेनू दत्तक योजनेत घेतले आहे. येथील जनावरांच्या वांझ समस्येवर उपचार सुरू केले आहेत. योग्य पोषण आहार न मिळालेल्या जनावरांमध्येच मृत्युमुखी पडणे, वांझ राहणे आदी समस्या दिसून येतात. त्यासाठी आम्ही या योजनेमार्फत प्रयत्नशील राहून जनावरांवर योग्य उपचार सुरू केले आहेत. भविष्यात दुधाची विक्री करण्यासाठी गावकऱ्यांना प्रोत्साहित केले जाईल.
इथं चार पिढ्यांपासून दूध विकलं जात नाही!
By admin | Published: July 12, 2015 12:41 AM