सांगली : दूधदर वाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने सुरु असलेल्या आंदोलनाचा सांगली जिल्ह्यात भडका उडू नये, यासाठी पोलिसांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे. मंगळवारी पहाटे पोलीस संरक्षणार्थ दूध वाहतूकीचे टँकर मुंबईला रवाना करण्यात आले. लहान-मोठ्या दूध संकलन केंद्राबाहेर पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यातही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मंगळवारी आक्रमक झाले .
सांगली जिल्ह्यातही आसद, ता. कडेगांव येथे दुध उत्पादक शेतकर्यांला दुधाचा अभिषेक घालुन आंदोलन करण्यात आले, तर आष्टा येथे दूध गंगा गाड़ी फोडण्यात आली, तसेच तासगाव कोल्हापूर-बस फोडली. कार्यकर्त्यांनी भिलवडी परिसरात दूध संकलन बंद पाडले. सांगली जिल्ह्यातील दूधही बंदोबस्तात पोलीस दूध संघात पोहच करीत आहे. दरम्यान, स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांच्यासह कार्यकर्त्यांनी दूध संघ बंद ठेवावेत असे आवाहन संघांना केले आहे.
दुधाचे गोरगरिबांना, शाळकरी मुलांना वाटप करण्यात आले. अनेक गावात ग्रामदैवतास दुग्धाभिषेक घालण्यात आला. पण सायंकाळी जमा झालेल्या दुधाचा प्रश्न निर्माण झाला. या दूधाचे संकलन करण्यात आले. याची नेहमीप्रमाणे पुणे, मुंबईला वाहतूक करताना यावी, यासाठी दूध संघांना टँकरना पोलीस संरक्षण पुरविण्यात आले.संघाजवळ सोमवारी रात्रीपासून पोलीस तैनात केले होते. मध्यरात्री व मंगळवारी पहाटे टँकरच्या दोन्ही बाजूला, पुढे-मागे संरक्षण देण्यात आले होते. साधारपणे दहाहून अधिक टँकर रवाना झाले. या टँकरना सातारा शहरापर्यंत संरक्षण दिले होते. तेथून सांगलीचे पोलीस परतले. सातारा पोलीस या टँकरसोबत पुढे गेले. कर्नाटकातून सांगलीमार्गे मुंबईला जाणाऱ्या टँकरना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. मंगळवारी सकाळी लहान-मोठ्या दूध संकलन केंद्राजवळ पोलिसांचा पहारा होता.
वाहनांची तपासणीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर पोलीस दररोज रात्री रस्त्यावर थांबून संशयित वाहनांची तपासणी करतात. पण दूध आंदोलनामुळे पोलिसांना आणखी सतर्क रहावे लागले. दूध वाहतूक टँकरची मोडतोड किंवा लहान दूध व्यवसायिकांची अडवणूक होऊ नये, यासाठी सोमवारी रात्री बारानंतर शहरात येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्या प्रत्येक वाहनधारकास थांबवून त्याची चौकशी केली. वाहनाचा क्रमांक, चालकाचे नाव व पत्ता, याची नोंद करुन घेतली.
जिल्ह्यात दूधदर वाढीचे आंदोलन शांततेत सुरु आहे. कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. मी स्वत: इस्लामपूरसह काही गावातातील दूध संस्थांना भेटी देऊन पाहणी केली. दूध रस्त्यावर ओतून देऊ नये, त्याचे संकलन व्हावे, यासाठी लहान-मोठ्या दूध संकलन केंद्रांना पोलीस संरक्षण दिले आहे. मुंबईकडे दूध वाहतूक करणाऱ्या टँकरना आंदोलन सुरु राहिपर्यंत संरक्षण दिले जाईल.- सुहेल शर्मा, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली.