दत्ता पाटील-- तासगाव नगरपालिकेची बुधवारी सर्वसाधारण सभा झाली. नियमबाह्य कामांचा विषय चव्हाट्यावर आला आहे. यानिमित्ताने आजी-माजी नगराध्यक्षांची जुगलबंदी रंगली. दोघांनीही एकमेकांच्या निमयबाह्य कामांचा सुचक उल्लेख केला. आधी काम, नंतर मंजुरी हा विषय एका इलेक्ट्रीकलच्या कामापुरताच नसून, यापूर्वीही अनेक कामे अशापध्दतीने झाली असल्याचे दस्तुरखुद्द नगराध्यक्षांच्या वक्तव्याने चव्हाट्यावर आले. असे प्रकार नागरिकांच्या सोयीसाठी की कारभाऱ्यांच्या सोयीसाठी? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहेच. किंबहुना ‘मिल बॉँटके खाओ‘चा कारभारदेखील चव्हाट्यावर आला आहे. तासगाव नगरपालिकेची बुधवारी झालेली सभा अनेकअर्थाने चर्चेचा विषय ठरली. या चर्चेची सुरुवात व्यापारी संकुलातील लाईट फिटींग कामाच्या निविदा मंजुरीवरुन झाली. या कामाची निविदा ऊघडण्यात आल्यानंतर, पालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी घेणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून नागरिकांच्या हितासाठी नगरसेवकांना दिलेला हा हक्क डावलून कामाची वर्कआॅर्डर घेण्याआधीच संबंधित ठेकेदाराने कामाची सुरुवात केली. वास्तविक या कामापासून अपवाद वगळता सर्वच नगरसेवक अनभिज्ञ(?) होते. सभेत विषयपत्रिकेवर विषय आल्यानंतर आणि ‘लोकमत’च्या बातमीतून खरा प्रकार चव्हाट्यावर आणल्यानंतर, नगरसेवकांना या कारभाराची माहिती झाली. या विषयावरुन माजी नगराध्यक्ष अजय पवार यांनी नगराध्यक्ष बाबासाहेब पाटील यांना धारेवर धरले. त्यावेळी नगराध्यक्ष पाटील यांनीही माजी नगराध्यक्ष पवार यांच्यावर त्यांच्या काळातही अशापध्दतीने कामे झाली असल्याचा आरोप केला. के. के. नगरमधील रस्त्याचे काम आधी आणि नंतर मंजुरी असाच प्रकार झाला आहे. निमयबाह्य अनेक कामे मला माहीत आहेत. बाकीच्या कामांचा अजून उल्लेख केला नाही, असा सूचक इशारा पाटील यांनी दिला.नगरसेवकांतील सुंदोपसुंदी आणि राजकीय इर्षेतून व्यापारी संकुलाच्या कामाचा विषय चव्हाट्यावर आला. या विषयातून नगराध्यक्ष पाटील यांनी माजी नगराध्यक्षांच्या काळातील बेकायदा कामाचा उल्लेख केला. पाटील यांच्या काळात होत असलेल्या नियमबाह्य कामांबाबत नगरसेवक अजय पवार यांनी आक्षेप घेतल्याने, त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी अजय पवार यांच्या काळातील नियमबाह्य कामांचा विषय पुढे केला. मात्र हा विषय नगराध्यक्ष पाटील यांच्यासह अनेक नगरसेवकांना यापूर्वीच माहिती होता. अशा पध्दतीने कामे होत असताना, नगरसेवकांचे मौन कशासाठी? नियम धाब्यावर बसवून कारभार होत आहे, याची माहिती असूनदेखील गेल्या चार वर्षात कोणताच गैरकारभार नगरसेवकांनी चव्हाट्यावर आणला नाही. तर ठराविक नगरसेवकांच्या प्रभागात विकासकामांच्या मंजुरीचा विषय ऐरणीवर आला. यावेळी बाबासाहेब पाटील यांनी पवार यांच्यावर तुम्हीच अशा पध्दतीने काम करत असल्याचा आरोप केला. यावर पवार यांनी त्यामध्ये तुमचाही समावेश असल्याचे सांगितले. त्यामुळे मिल बॉँट के खाओ अशा पध्दतीनेच हा कारभार सुरु होता का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. तसे असेल तर तासगावकर जनतेने निवडणुकीत टाकलेला विश्वास कितपत सार्थ ठरला, याचे आत्मपरीक्षण करायला हवे. नेत्यांच्या अपेक्षांना तडा पालिकेच्या चार वर्षांच्या काळात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, खासदार संजयकाका पाटील आणि काँग्रेस अशा सर्वच गटांचे आणि पक्षांचे कारभारी आळीपाळीने सत्तेत राहिले. नगरपालिकेमध्ये सत्तेचे तळे राखताना, पाणी चाखण्याचे काम अनेकांकडून झाले. बहुतांश कारभाऱ्यांचा कारभार काचेच्या घरातूनच झाला. निमयबाह्य कामांविरोधात दगड मारण्याचे धाडस नगरसेवकांकडून होत नसल्याचेच आतापर्यंतचे चित्र असून, सर्वच नेत्यांच्या पारदर्शी कारभाऱ्यांच्या अपेक्षांना पालिकेतील कारभाऱ्यांकडून तडा गेला आहे.नियमांची तडजोड कोणासाठी?व्यापारी संकुलाचे काम अनेक वर्षांपासून सुरु आहे. या कामासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदतवाढ संपली तरी हे काम सुरुच आहे. इतक्या वर्षात या कामासह पालिकेच्या अनेक रखडलेल्या कामांबाबत एकही नगरसेवक आग्रही असल्याचे दिसून आले नाही. या रखडलेल्या कामांमुळे पालिकेचे आणि पर्यायाने नागरिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. त्यावेळी कामांसाठी अट्टाहास झाला नाही. लाईट फिटींगच्या कामात आर्थिक गैरव्यवहार नसला, तरी नियम डावलून काम करण्याचा अट्टाहास हा जनतेच्या हितासाठी आहे की कारभाऱ्यांच्या सोयीसाठी? या प्रश्नाचे उत्तर जगजाहीर आहे.
‘मिल बॉँटके खाओ’चा कारभार चव्हाट्यावर
By admin | Published: December 31, 2015 11:29 PM