लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : विनापरवाना पाणी उपसा केल्याच्या कारणावरुन शेतकऱ्यांवर शासन दंडात्मक कारवाई करत आहे. मात्र रस्ता कामासाठी दररोज लाखो लिटर उपसा करणाऱ्या ठेकेदारावर कोणतीही कारवाई केली जात नसल्याबद्दल शेतकऱ्यांत नाराजी पसरली आहे.
गावातील ओढयात वाहणारे पाणी जर शेतकऱ्याने अडवून आपल्या शेतीला दिले असल्याची माहिती मिळाल्यास त्याच्यावर शासन पातळीवर दंडात्मक कारवाई करून त्यास पैसे भरुन पाणी परवाना घेण्यास सक्ती केली जाते. मात्र सध्या कऱ्हाड-कोकरुड राज्य मार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने या कामासाठी दररोज एक लाख लिटरपेक्षा जास्त पाणी लागत आहे. गेल्या एक महिन्यांपासून दररोज मुख्य ओढयातील लाखो लिटर पाणी उपसा होत असताना, याकडे शासनाचे लक्ष आहे ना ग्रामपंचायतीचे. शेतकऱ्यांनी कधी तरी शेतीसाठी पाणी घेतले, तर कारवाई करणारे शासन याकडे लक्ष देणार का? अशी विचारणा शेतकरी वर्गातून होत आहे.