सांगली : येथील गवळी गल्लीतील मिलिंद ऊर्फ मिंच्या गवळी खून प्रकरणात आणखी दोघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) विभागाने अटक केली. या दोघांकडून गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. मिंच्याचा खून सहाजणांनी केल्याचे तपासात पुढे आले असून, आतापर्यंत पाचजणांना अटक केली आहे. पिस्तूल देणाऱ्यासही लवकरच अटक केली जाईल, असे जिल्हा पोलिसप्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी बुधवारी पत्रकार बैठकीत सांगितले अटक केलेल्यांत संजय अण्णाप्पा व्होसमणी (वय २७), अतुल ऊर्फ बाबू संजय पाटील (२३, दोघेही रा. सांगलीवाडी) या दोघांचा समावेश आहे. या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, २६ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. गेल्या आठवड्यात गवळीच्या खुनाचे प्रकरण उघडकीस आले होते. याप्रकरणी राहुल भोसले, सिद्धार्थ चिपरीकर (दोघे रा. सांगलीवाडी), भागवत मधुकर पाटील (रा. कवठेपिरान) या तिघांना अटक केली आहे. त्यानंतर तपास पुढे सरकलाच नाही. यामध्ये आणखी तीन ते चार जणांचा सहभाग असण्याची शक्यता होती. शहर पोलिसांचा तपास संथगतीने सुरु असल्याचे लक्षात येताच पोलिसप्रमुख शिंदे यांनी हा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील व त्यांच्या पथकाने अटकेतील तीन संशयितांची कसून चौकशी केली. कोणत्या कारणासाठी मिंच्याचा खून झाला, त्यासाठी कोणती वाहने वापरण्यात आली. संशयितांनी त्याला कोणत्या मार्गाने नेले, याचा तपास करण्यात आला. पोलिसी खाक्या दाखविताच संशयितांनी या गुन्ह्णात मदत केलेल्या आणखी दोघांची नावे सांगितले. त्यानुसार पथकाने संजय व्होसमणी व अतुल पाटील या दोघांना अटक केली. आतापर्यंत या खुनात अटक केलेल्यांची संख्या पाच झाली आहे. आणखी एकाचा सहभागही उघड झाला असून त्यालाही लवकरच अटक केली जाणार आहे. या कारवाईत पोलिस निरीक्षक बाजीराव पाटील, सहाय्यक निरीक्षक अमितकुमार पाटील, हवालदार सागर पाटील, संदीप मोरे, अमित परीट, मुघराज रूपनर, मारुती सूर्यवंशी, महादेव नागणे, रवी पाटील, सुनील भिसे, महेश आवळे, शंकर पाटील यांनी भाग घेतला. -------------- खुनामागे आर्थिक वादाचे कारण मिंच्या गवळीचा खून आर्थिक वादातून झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. मुख्य संशयित राहुल भोसले याच्या सासऱ्याची कोल्हापूर रस्त्यावरील आकाशवाणी केंद्राजवळ सव्वा एकर शेती आहे. या शेतीचा व्यवहार मिंच्या गवळी याच्यासोबत झाला होता. मिंच्याने त्यासाठी भागवत पाटील याच्याकडे १५ लाख रुपये दिले होते, पण नंतर हा व्यवहार पूर्ण झाला नाही. मिंच्याने भोसले व पाटील यांच्याकडे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला होता. शिवाय भरपाईपोटी तो जादा रकमेची मागणी करीत होता. या वादातून त्याचा खून करण्यात आल्याचे पोलिसप्रमुख शिंदे यांनी सांगितले. ----------------- मोबाईलचा शोध घेणार : शिंदे संशयितांनी मिंच्याचा मोबाईल कृष्णा नदीत फेकला आहे. त्याचा शोध घेण्यात आला. सिंधुदुर्गवरून त्यासाठी स्कुबा ड्रायव्हरही मागविण्यात आले, पण नदीतील पाण्याची पातळी वाढल्याने मोबाईलचा शोध थांबविण्यात होता. आता नदीतील पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा मोबाईलचा शोध घेतला जाईल. दरम्यान, नदीपात्रात सापडलेली हाडे व मिंच्याच्या नातेवाईक यांचे डीएनए तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचा अहवालही या खून प्रकरणात महत्त्वाचा आहे. या खूनप्रकरणी कुणाची गय केली जाणार नाही, असे जिल्हा पोलिसप्रमुख शिंदे यांनी स्पष्ट केले. पिस्तूल कोणाचे? मिंच्याच्या खुनात वापरलेले पिस्तूल कोणाचे होते? ते कोणी दिले? याचा एलसीबीकडून शोध सुरू आहे. यापूर्वी शहर पोलिसांनी हे पिस्तूल मिंच्याचे असल्याचे स्पष्ट केले होते, पण याप्रकरणी संशयितांकडून पोलिसांची दिशाभूल केली जात आहे. दरम्यान, संशयितांची कसून चौकशी केल्यानंतर संबंधित पिस्तूल देणाऱ्याचे नाव तपासात पुढे आले आहे. लवकरच त्यालाही अटक केली जाईल.
मिंच्याच्या खूनप्रकरणी आणखी दोघे अटकेत
By admin | Published: September 22, 2016 1:00 AM