लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिकेच्या मानधन व बदली कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार पगार देण्याचा ठराव महासभेने करूनही त्याची अंमलबजावणी प्रशासनस्तरावर लांबली होती. अखेर आयुक्त रवींद्र खेबूडकर यांनी एक एप्रिलपासून किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करून येत्या आठवडाभरात कर्मचाऱ्यांना पगार अदा केले जातील, अशी ग्वाही मंगळवारी महासभेत दिली. बदली व मानधनावरील कर्मचाऱ्यांना पालिकेकडून पाच हजार रुपये वेतन दिले जात होते. कर्मचारी संघटनांनी किमान वेतन कायद्यानुसार पगार द्यावेत, अशी मागणी केली. त्यानुसार फेब्रुवारी महिन्यातील महासभेत हा ठराव करण्यात आला. पण प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारामुळे या ठरावाची अंमलबजावणी होऊ शकली नाही. त्यामुळे हे कर्मचारी गेली दोन महिने वेतनापासून वंचित आहेत. मंगळवारी महासभेत इतिवृत्त मंजुरीवेळी पुन्हा ठरावावर चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाची दखल घेत महापौर हारुण शिकलगार यांनी आयुक्तांशी सभेतच चर्चा केली. आयुक्तांनी या ठरावाची अंमलबजावणी करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. एप्रिल महिन्याचा पगार किमान वेतन कायद्यानुसार आठवडाभरात कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल, असे स्पष्ट केले. या विषयावर नगरसेवक संजय बजाज, विरोधी पक्षनेते शेडजी मोहिते यांनी आक्रमक भूमिका घेतली. बजाज यांनी वेतन देणार होता, तर इतके दिवस का थांबविले, असा सवाल केला. तर मोहिते यांनी आजअखेर कामावर असलेल्यांना सर्वांना त्याचा लाभ देण्याची मागणी केली. पण महापौर शिकलगार यांनी नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन महिन्यांत कामावर हजर असलेल्यांनाच किमान वेतनाचा लाभ दिला जाणार आहे. हा ठराव होणार, असे दिसताच अनेकजण कामावर हजर होऊ लागले आहेत. गेली चार ते पाच वर्षे कामावर नसलेल्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणार नसल्याचे स्पष्ट केले.
कर्मचाऱ्यांना आठवड्याभरात किमान वेतन
By admin | Published: May 23, 2017 11:33 PM