विटा : दुष्काळी भागाला वरदान ठरणारी टेंभू योजना हे आमदार अनिल बाबर यांचे अपत्य आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे दुसऱ्याचे अपत्य आपल्या मांडीवर खेळविण्याचे राजकारण कोणी करू नका, असा सणसणीत सल्ला पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांना दिला. ‘अनिल बाबर.. टीकाकारांकडे लक्ष देऊ नका, तुम्हीच आता टेंभूवाले बाबा झाला आहात’, अशी टीप्पणीही पाटील यांनी यावेळी केली.नागेवाडी (ता. खानापूर) येथे गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राष्ट्रीय पेयजलच्या पाणीपुरवठा योजनेसह साडेतीन कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन झाले. यावेळी नागेवाडीचे ‘नागनाथनगर’ असे नामकरण पार पडले. आमदार अनिल बाबर अध्यक्षस्थानी होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा बॅँकेचे संचालक तानाजीराव पाटील, जिल्हाप्रमुख संजय विभुते, अरुण खरमाटे, सरपंच सतीश निकम उपस्थित होते.पाटील म्हणाले, अनिल बाबर हे राजकारणात ब्रॅन्ड आहेत. माझ्याप्रमाणे त्यांनाही पराभव स्वीकारावा लागला; पण कोण कामाचा माणूस आहे, हे जनतेला माहिती असते.अनिल बाबर म्हणाले, मला मंत्रिपदापेक्षा शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद महत्त्वाचा आहे. अजून नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका व्हायच्या अगोदरच पुढचा आमदार कोण? याची विरोधक चर्चा करीत आहेत. पण जनतेचा आशीर्वाद मला असला की अशी टीका करणाऱ्या विरोधकांचा पालापाचोळा होणार.सरपंच सतीश निकम यांनी स्वागत केले. संजय विभुते, तानाजीराव पाटील यांनी अनिल बाबर यांना विस्तारात मंत्रिपद मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रा. बबन निकम, हणमंतराव निकम, महावीर शिंदे, विनोद गुळवणी, हेमंत बाबर, उमेश काटकर, उत्तम चोथे, प्रांताधिकारी संतोष भोर, तहसीलदार ऋषिकेश शेळके, गटविकास अधिकारी संदीप पवार, अभियंता सुरेंद्रकुमार कदम उपस्थित होते.आंदोलनजीवीनंतर आता निवेदनजीवीसुहास बाबर म्हणाले, मध्यंतरी आंदोलनजीवी लोक तयार झाले होते. तसे आता निवेदनजीवी लोक उदयास आले आहेत. ग्रामपंचायत, पंचायत समिती, आमदारकी व मुख्यमंत्री आमचा आहे. ज्याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही, ते आमच्यावर टीका करीत आहेत; परंतु आगामी काळात निवेदनजीवी लोकांना डोके वर काढून देणार नाही.
दुसऱ्याचे अपत्य मांडीवर खेळविण्याचे राजकारण करू नका, मंत्री गुलाबराव पाटलांचा विरोधकांना सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 4:38 PM