आष्टा : इथेनॉल भविष्यातील इंधन असून उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मितीसाठी साखर कारखान्यांनी पुढे यावे, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्गमंत्रीनितीन गडकरी यांनी शुक्रवारी केले. पेठ नाका ते सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. हे काम महिन्यात सुरू हाेईल. रस्त्याच्या कामात गडबड करणाऱ्यांची खैर नाही, असा इशारा त्यांनी दिला.आष्टा येथे झालेल्या कार्यक्रमास पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील व धैर्यशील माने, आ. जयंत पाटील, सुधीर गाडगीळ, मानसिंगराव नाईक, विश्वजीत कदम, सुमनताई पाटील, विक्रम सावंत, गोपीचंद पडळकर, जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, उसाच्या रसापासून थेट इथेनॉल निर्मिती झाल्यास त्याचा लाभ साखर कारखान्यांसह शेतकऱ्यांना होणार आहे. इथेनॉलसह हायड्रोजनही भविष्यातील इंधन असून त्याच्या निर्मितीसाठीही शेतकऱ्यांनी पुढे यावे.गडकरी म्हणाले, पेठ-सांगली या रस्त्याचे काम एक महिन्यात सुरू होणार आहे बदलत्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून या रस्त्याची बांधणी करण्यात येणार आहे. या भागातील शैक्षणिक संस्थांनी दुतर्फा झाडी लावून हा रस्ता ग्रीन हायवे करावा.पालकमंत्री खाडे म्हणाले, मार्चनंतर या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन दर्जेदार रस्ता होईल.या रस्त्यामुळे भागातील गावे राष्ट्रीय महामार्गाच्या नकाशावर आल्याने या परिसराचा विकास होईल, असे खासदार पाटील म्हणाले. राष्ट्रीय महामार्गचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी प्रास्ताविक केले.
असा असणार रस्ता
- पेठ नाका ते सांगली हा ४१.२५ किलोमीटरचा रस्ता ईपीसी तत्त्वावर काँक्रिट चौपदरीकरण करून पुनर्बांधणी.
- ८६० कोटी ४५ लाख रुपये मंजूर.
- चारपदरी काँक्रिट रस्ता, मध्यभागी ०.६ मीटरचा दुभाजक, दुभाजकापासून दोन्ही बाजूस ७.५ मीटर रुंदीचा काँक्रिट रस्ता व १.५ मीटर रुंदीची बाजू पट्टी.
- रस्त्यावर १० छोटे पूल, १५ बॉक्स सेल मोरी, ६० पाइप मोरी, दोन ट्रक थांबे, दहा बस शेड, सहा मोठे जंक्शन, ३४ लहान जंक्शन, एक टोल नाका एक (तुंग ते कसबे डिग्रज दरम्यान), काँक्रिट गटार १४.२०४ कि.मी. दोन्ही बाजूस, खुली गटार २७.०४६ कि.मी. दोन्ही बाजूस.