सांगली : काही लोकांवर जादा विसंबून राहिल्याने कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. माझ्याकडूनही काही चुका झाल्या, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
सांगलीत शनिवारी नगरपंचायतीत निवडून आलेल्या काँग्रेस नगरसेवकांचा सत्कार व मुख्य नोंदणीकर्ता प्रशिक्षण शिबिर पार पडले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील, आमदार विक्रम सावंत, जयश्रीताई पाटील, शैलजा पाटील उपस्थित होते. मंत्री कदम म्हणाले, सांगली जिल्ह्यात काँग्रेस एकसंघपणे बांधण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आत्मपरीक्षण केले जाईल. जिल्ह्यातील काँग्रेस एकसंघपणे बांधण्यासाठी झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी आत्मपरीक्षण केले जाईल.पक्षामध्ये जे काही अंतर्गत वाद असतील ते बंद खोलीत एकत्र बसवून मिटविले जातील. यापुढे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करण्यावर भर राहील असं त्यांनी सांगितले.
कडेगाव नगरपंचायतीमध्ये निवडणुकीत काहीजणांवर जादा विसंबून राहिल्याने पराभव झाला. माझ्याकडूनही काही चुका झाल्या. याचे मी आत्मचिंतन व आत्मपरीक्षण करेन. पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघात मी निवडून येणार की नाही, हे मतदारसंघातील सामान्य जनता ठरविणार आहे. इतरांनी याबाबतची काळजी अजिबात करू नये. पक्षाची बांधणी चांगल्या प्रकारे करण्यासाठी पुढील काळात सर्व प्रमुख पदाधिकार्यांना घेऊन प्रत्येक तालुक्याचा दौरा करणार आहे अशी माहितीही विश्वजित कदम यांनी दिली.