सांगली : शहर परिसरातील एका उपनगरात दिवाळी सुटीसाठी आजीकडे आलेल्या अल्पवयीन मुलीवर अल्पवयीन सख्या भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. दोन वर्षांपूर्वी भावाने हे कृत्य केल्यानंतर त्याने दोन अल्पवयीन मित्रांसमवेत पीडितेसोबत सतत लैंगिक अत्याचार सुरूच ठेवले होते. पीडितेच्या शाळेतील समुपदेशक महिलेने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. तेथून शून्य क्रमांकाने संजयनगर पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पीडित मुलगी ही आई, भाऊ आणि बहिणीसह पुणे परिसरात राहते. पीडितेचा अल्पवयीन भाऊ हा सांगलीत आजीकडे राहतो. दोन वर्षांपूर्वी पीडित मुलगी कुटुंबीयांसह दिवाळीच्या सुटीत सांगलीत आजीच्या घरी आली होती. एके दिवशी आई, बहीण आणि आजी बाजारात खरेदीसाठी गेले होते. घरात कोणीही नव्हते. पीडित मुलीचा अल्पवयीन सख्खा भाऊ तिच्या खोलीत आला. याने पीडितेशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर संशयित अल्पवयीन मुलगा हा अश्लील बोलून पीडितेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत होता. संशयित मुलाचे दोघे अल्पवयीन मित्रही पीडित मुलीसोबत लैंगिक कृत्य करत होते.जानेवारी २०२२ ते दि. ३ जून २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला. पीडितेने घाबरून हा प्रकार कोणाला सांगितला नाही. परंतु सततच्या त्रासाला कंटाळून तिने शाळेत एका समुपदेशनाच्या कार्यक्रमात हा प्रकार सांगितला. त्यामुळे समुपदेशक महिलेस धक्का बसला. त्यांनी पुण्यातील फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. परंतु सांगलीत प्रथम हा प्रकार घडल्यामुळे संजयनगर पोलिस ठाण्याकडे गुन्हा वर्ग करण्यात आला आहे.
धक्कादायक! सांगलीत अल्पवयीन भावाकडून बहिणीवर लैंगिक अत्याचार, दोन अल्पवयीन मित्रांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 16:53 IST