मिरज, 5 : मिरज रेल्वे स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोरील पोर्चचा स्लॅब प्रवाशांच्या अंगावर पडला. यामध्ये कोणी जखमी झाले नसले तरी, पावसाचे पाणी साचून स्लॅबचा पोर्च कमकुवत झाला आहे. त्यामुळे अचानक पोर्च कोसळल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
मिरज रेल्वे स्थानकाची सध्या अस्तित्वात असलेली इमारत १९७८ मध्ये बांधण्यात आली आहे. इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर सिमेंट काँक्रिटचा स्लॅब आहे. या स्लॅबवर वर्षानुवर्षे पावसाचे पाणी साचल्यामुळे स्लॅब कमकुवत झाला आहे. दोन दिवसांपूर्वी पडलेल्या मोठ्या पावसात तीन ठिकाणी पोर्चमधील स्लॅबचा काही भाग प्रवाशांच्या अंगावर पडला आहे. सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झाले नाही.
सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालेले नाही. रेल्वे प्रशासनाचे मात्र या घटनेकडे दुर्लक्ष झाले आहे. कमकुवत झालेला पोर्चचा स्लॅब तातडीने पाडून या ठिकाणी नवीन अद्ययावत पोर्च उभा करावा, अशी मागणी मिरज रेल्वे कृती समितीचे सचिव सुकुमार पाटील यांनी केली आहे.