शीतल पाटील --सांगली --ना नेता, ना पक्ष, केवळ सोयीचे राजकारण; हा अजेंडा असलेल्या ‘मिरज पॅटर्न’ची महापालिकेत धास्ती कायम आहे. त्यातच माजी मंत्री मदन पाटील यांच्या पश्चात महापालिकेचा कारभार कोणाच्या हाती जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे. मदनभाऊंच्या हयातीतच सत्ताधारी गटाची शकले झाली आहेत. त्यांच्या पत्नी जयश्रीतार्इंनी महापालिकेचे नेतृत्व स्वीकारले तरी, भविष्यात पदाधिकारी निवडीत त्यांचा शब्द कितपत प्रमाण मानला जाईल, त्यांच्या आदेशानेच कारभार होईल का, याविषयी साशंकता आहे. सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी रुग्णालयाच्या पलीकडे आम्हाला कोणी नेता नाही, की पक्ष नाही, असे मिरजेतील सर्वपक्षीय नगरसेवक उघडपणे सांगतात. सांगलीत आल्यावर मात्र पक्ष, नेता याची भाषा सुरू होते. त्याला कारणही आहे. मिरजेतील बहुतांश नगरसेवक स्वयंभू आहेत. त्यांचा प्रभागात वरचष्मा आहे. ते कोणत्याही पक्षातून निवडून येऊ शकतात. सांगली व कुपवाडची स्थिती मिरजेच्या नेमकी उलटी आहे. या दोन्ही शहरातील नगरसेवकांना स्वकर्तृत्वाबरोबरच नेता, पक्षाचाही आधार घ्यावा लागतो. त्याशिवाय त्यांची डाळ शिजत नाही. म्हणूनच सांगली, कुपवाडमध्ये अनेक दिग्गज नगरसेवकांना घरी बसावे लागले आहे. तसेच मिरजेतून मात्र तीच ती मंडळी वारंवार महापालिकेत निवडून येत आहेत. यामागे त्यांचे काम नाकारून चालणार नाही. जास्तीत जास्त निधी आपल्या प्रभागात खर्च करण्यात ही मंडळी तरबेज आहेत. काँग्रेसमधील दहा नगरसेवकांचा गट पतंगरावांचा आदेश प्रमाण मानत होता. त्यामुळे महापालिकेत काँग्रेस अल्पमतात आली होती. त्यातच मदनभाऊंचे अकाली निधन झाल्याने त्यांच्या गटाचे काय होणार, हा प्रश्न आहेच. मदनभाऊंच्या गटातही सारे काही आलबेल नाही. एकमेकांचा काटा काढण्यात या गटातील नगरसेवकही तरजेब आहेत. त्यातून दोन ते तीन गटही निर्माण झाले आहेत. एकमुखी कारभाराला मदनभाऊंच्या हयातीतच तडा गेला होता. त्यांच्या पश्चात ही दरी आणखी रूंदावण्याची चिन्हे आहेत. आगामी चार महिन्यात महापौर, उपमहापौर निवड होणार आहे. त्यात सर्वात मोठी भूमिका मिरज पॅटर्नची राहणार आहे. एकमेकांना साहाय्य करण्याच्या त्यांच्या भूमिकेमुळे कोणाचा बळी जाणार व कोण पदाची पालखी वाहणार, हे लवकरच कळेल.जयंतरावांचा आधारमदनभाऊ गटाची सत्ता महापालिकेत कायम ठेवायची असेल, तर या गटाला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील गटाची साथ घ्यावी लागणार आहे. खुद्द जयंतरावांनी, जयश्रीतार्इंच्या भविष्यातील राजकीय निर्णयप्रक्रियेत मी असेन, असे जाहीरपणे सांगितले आहे. त्यात मदनभाऊंशी त्यांचे सूत जुळले होते. जिल्हा बँक, बाजार समितीप्रमाणेच आता महापालिकेतही मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र आणण्याची गरज असल्याचे काँग्रेसचेच नगरसेवक जाहीरपणे बोलू लागले आहेत. याबाबतचे चित्र लवकरच स्पष्ट होणार आहे. काँग्रेसचे महापालिकेत ४० नगरसेवक असले तरी, जयश्रीतार्इंचा शब्द अंतिम मानणारे किती, याची आकडेमोड सुरू आहे. भविष्यात काही दगाफटका झाला तरी, मदनभाऊ गट व राष्ट्रवादी एकत्र सत्ता काबीज करू शकतात, अशी गणितेही मांडली जात आहेत. दबदबा संपलामहापालिकेच्याच नव्हे, तर जिल्ह्याच्या राजकारणात मदन पाटील यांचा मोठा दबदबा होता. त्यांच्या नजरेचीच धास्ती नगरसेवकांना असायची. फार्महाऊस असो अथवा विजय बंगला, पदासाठी आदळाआपट करणारे नगरसेवक केवळ त्यांनी नजर टाकली तरी शांत होत. महापालिकेत ते निर्णय घेतानाही परिणामांचा विचार करीत नसत. कोणताही निर्णय चुकला तर, तो बिनदिक्कतपणे मागे घेण्याची हिंमतही त्यांच्यात होती. याउलट जयश्रीतार्इंचा स्वभाव आहे. मदनभाऊ आक्रमक होते, तर जयश्रीताई मवाळ आहेत. कार्यकर्त्यांना ताकद देण्याची कसब त्यांच्याकडे आहे. म्हणून आजही मदनभाऊंचा केवळ जयश्रीतार्इंमुळेच टिकून आहे. नगरसेवकांना सातत्याने धाकात ठेवावे लागते. हा धाक कायम ठेवणे जयश्रीतार्इंना कितपत जमेल, हा प्रश्न आहे.
महापालिकेत मिरज पॅटर्न ठरणार डोकेदुखी
By admin | Published: October 28, 2015 11:18 PM