मिरज : मिरज-पुणे दुहेरीकरणाच्या कामाचा प्रारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याहस्ते पुढील महिन्यात होणार आहे. मिरज-पुणे या २८० किलोमीटर मार्गाच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा प्रक्रिया पार पडली असून, सप्टेंबर महिन्यात दुहेरीकरणाच्या कामाचे उद्घाटन व विश्रामबाग येथील रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाची सुरुवात करण्यासाठी रेल्वेमंत्री मिरजेत येण्याची शक्यता आहे. लोंढा-मिरज-पुणे मार्गाच्या दुहेरीकरणाच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता होणार आहे. यावर्षीच्या रेल्वे अर्थसंकल्पात दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामासाठी अर्थिक तरतुदीस मान्यता मिळाल्याने कामास गती मिळाली आहे. पुणे ते मिरज दरम्यान दुहेरीकरणाच्या कामाची मध्य रेल्वेने तीन टप्प्यात निविदा प्रक्रिया पूर्ण केली असून पाच वर्षात हे काम पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. लोंढा ते मिरज या १९० किलो मिटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाची निविदा दक्षिण-पश्चिम रेल्वेने यापूर्वीच काढून कामास सुरूवात केली आहे. सप्टेंबर पासून पुणे येथून दुहेरीकरणाच्या कामास सुरूवात होण्याची शक्यता आहे. मिरज-पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर रेल्वेगाड्यांच्या संख्येत आणखी वाढ होणार आहे. मिरज ते पुणे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरण झाल्यानंतर पुणे, मुंबई प्रवास जलद व सोयीचा होणार आहे. पुणे-मिरज दुहेरीकरणाच्या कामासाठी सातारा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येणार असून सुमारे २८० किलोमिटर लांबीच्या दुहेरीकरणाच्या कामाचे नियंत्रण सातारा येथील कार्यालयातून होणार आहे. (वार्ताहर)विश्रामबाग पुलासाठी १६ कोटीविश्रामबाग येथे रेल्वे उड्डाण पुलासाठी १६ कोटी खर्चाची निविदा काढण्यात आली आहे. रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाचे भूमीपूजन करण्यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू येणार आहेत.
मिरज-पुणे दुहेरीकरण सप्टेंबरमध्ये
By admin | Published: August 07, 2016 12:12 AM