सदानंद औंधे ।मिरज : हृदयरोग, मधुमेह, पक्षाघात, कर्करोग आणि संधिवात या पाच आजारांपैकी संधिवात हा वेदना आणि अपंगत्व निर्माण करणारा रोग आहे. संधिवाताच्या रूग्णांची संख्या वाढत असली तरी, गेल्या काही वर्षात नवी औषधे, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, सांधेरोपण शस्त्रक्रिया यामुळे संधिवाताच्या उपचारांमध्ये क्रांती झाली आहे. लवकर निदान व योग्य उपचारामुळे संधिवाताचे नियंत्रण करणे शक्य असल्याचे अस्थिरोग तज्ज्ञांनी सांगितले.
शरीरातील सुमारे २०० सांध्यांपैकी अर्धेअधिक मणक्यात असतात. हालचाल हे सांध्याचे मुख्य कार्य आहे. सांधा दुखणे आणि हालचालीत बाधा येणे, याला संधिवात म्हणतात. तिशीनंतर १४ टक्के शहरी, तर १८ टक्के ग्रामीण लोकांचे सांधे दुखत असतात. काही सर्वेक्षणांमध्ये तर याहीपेक्षा हे प्रमाण जास्त आहे. हजारात एखाद्या मुलाचे सांधे दुखतात. संधिवाताचे प्रमाण स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात आढळते. पुरुषांतील संधिवातामुळे मणक्याची झीज व कंबरदुखीचा त्रास होतो. संधिवात झालेल्या लहान मुलांची वाढ खुंटते. झिजेचे आणि सुजेचे असे संधिवाताचे दोन प्रकार आहेत.
वयोमान, मार लागणे, स्थूलता, सांध्यांचा अतिवापर, व्यायामाच्या अभावाने स्नायूंचा अशक्तपणा, अशी संधिवाताची वेगवेगळी कारणे आहेत. मानेचे, तसेच कमरेचे मणके आणि गुडघा, खांदा, घोट्याच्या सांध्यांची झीज होऊन हे सांधे दुखतात व हळूहळू अकार्यक्षम बनतात. काम केल्यानंतर, जिने चढताना गुडघे दुखणे, दिवसभर कॉम्प्युटरवर बसून सायंकाळी मान किंवा कंबर दुखणे, हे झिजेच्या संधिवाताचे मुख्य लक्षण आहे. हळूहळू दुखणे वाढून सांधा सतत, तसेच रात्रीही दुखत राहतो. कालांतराने सांधा निकामी होतो. अनेक आजारांत सांध्यांना सूज येते. हाता-पायांची बोटे, तसेच मनगट आणि घोट्याचे असे अनेक सांधे सुजतात व दुखतात. सुजेमुळे सांधे आतून खराब होतात आणि कधीही न भरून येणारी हानी होते. बोटे आणि इतर सांधे वेडेवाकडे होतात. वेदना आणि व्यंग यामुळे उदासीनता येते.
तिशीनंतर रक्तातल्या संधिवातामुळे त्रास सुरू होतो. गरजेपेक्षा जास्त आहारामुळे गुडघ्यावर ताण पडून गुडघ्याची झीज होऊन वेदना सुरू होतात. लवकर निदान झाले तर योग्य उपचारांनी सांधे पूर्ववत होऊ शकतात, व्यंग टाळता येते. संधिवाताचे लक्षण असणारे सुमारे शंभरएक आजार आहेत. त्यांच्या अचूक निदानाचे आणि औषधोपचाराचे ºहुमॅटॉलॉजी हे वैद्यकशास्त्र आहे. संधिवातावर उपचार उपलब्ध झाल्याने रूग्णांना जगणे सुसह्य झाले आहे.गैरसमजुती दूर होऊन जागरुकता वाढणे महत्त्वाचे : कुलकर्णीसंधिवाताविषयी गैरसमजुती जास्त असल्याने, आजार वाढून अपंगत्व येते. संधिवातावर वेगवेगळे उपचार उपलब्ध आहेत. सांधेरोपणासह वेडेवाकडे झालेले अवयव शस्त्रक्रियेने सरळ करता येतात. संधिवातावरील अद्ययावत उपचारांबाबत समाजात जागरुकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मिरजेतील अस्थिव्यंगतज्ज्ञ डॉ. हर्षल कुलकर्णी यांनी सांगितले.