लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : मिरजेत जुन्या कागदांचा शोध घेताना इब्राहिम आदिलशाहच्या काळातील १५५३ मधील प्रशासकीय वही सापडली आहे. शिकार केलेल्या हरणाच्या कातडीपासून त्याचे वेष्टण केले असून, हाताने तयार केलेल्या कागदांवरील कागदपत्रे यामध्ये आहेत. फर्मान, सनद यांचा यात समावेश असल्याची माहिती इतिहास संशोधक मानसिंगराव कुमठेकर यांनी मंगळवारी दिली. ते म्हणाले की, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी जिल्ह्यातील सर्व शासकीय रेकॉर्ड रूमच्या तपासणीची मोहीम सुरू केली होती. या मोहिमेत अनेक जुने दस्तऐवज आम्हाला आढळले. त्यात सर्वांत जास्त जुना दस्तऐवज मिरजेच्या रेकॉर्ड रूममध्ये सापडला. तो इब्राहिम आदिलशाह पहिला आणि दुसरा यांच्या कालावधितील आहे. उर्दू, फारसी, अरबी आणि मोडी अशा चार भाषेतील कागदपत्रे यात आहेत. यामध्ये फर्मान, सनद या गोष्टींचा समावेश आहे. औरंगजेबच्याही एका फर्मानाचा यात समावेश आहे. १५५३ ते १७३९ या काळातील कागदपत्रांचा हा संच आहे. दुसऱ्या आदिलशाह हा सरस्वतीभक्त होता, याचेही पुरावे यात सापडले आहेत. एका पत्राची सुरुवात या अदिलशाहने ‘पूज्य सरस्वती’ अशी केली आहे. रायबागपर्यंतचा मोठा प्रांत त्यावेळी इब्राहिम आदिलशाही राजवटीत होता. त्याचाही उल्लेख यात सापडला आहे. हा ऐतिहासिक दस्तऐवज आता नव्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अत्याधुनिक रेकॉर्ड रूममध्ये ठेवण्यात आला आहे. मिरजेत १८५0 मधील ४० मण वजनाचा मोठा तांब्याचा हंडाही सापडला आहे. एक माणूसही बसू शकेल, इतका तो मोठा आहे. मिरजेतील कमळेश्वर देवस्थानकडून तो जप्त केल्याचा उल्लेख आढळतो. त्याचबरोबर याठिकाणी १८३0 मधील एक जुने घड्याळही सापडले आहे, असे कुमठेकर म्हणाले. सापडलेल्या अशा अनेक वस्तू आता नव्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीत ठेवण्यात येणार आहेत. या कार्यालयात कागदपत्रांसाठी खास धूळविरहीत कपाटे तयार केली आहेत. याचा अभ्यास व माहितीसाठी कोणालाही उपयोग करता येईल, असे जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी सांगितले. सिक्रेट डॉक्युमेंटपूर्वीच्या प्रशासकीय कारभारात किंवा संस्थानकालीन प्रशासकीय काळात एक सिक्रेट डॉक्युमेंटची परंपरा सांगली जिल्ह्यात होती. त्याचेही पुरावे आढळले आहेत. एक अधिकारी बदलून जाताना दुसऱ्या अधिकाऱ्यास हे सिक्रेट डॉक्युमेंट देत होता. जेणेकरून प्रशासकीय कामकाजातील त्रुटी आणि जमेच्या बाजू नव्या अधिकाऱ्यास लगेच माहिती होत होत्या. हरणाच्या शिकारीची खूणहरणाच्या कातडीपासून तयार केलेल्या वेष्टणाला एक छिद्र आहे. तेथे बाण लागल्याचे दिसून येते. बाणाची स्पष्ट खूण त्यावर दिसते. या वहीत वापरण्यात आलेले कागदे त्यावेळी हाताने तयार केलेले आहेत. त्यामुळे ते खराब झालेले नाहीत. आजवर ते टिकून राहिले आहेत.
मिरजेत सापडला १५५३ चा ऐतिहासिक आदिलशाही दस्तऐवज
By admin | Published: June 07, 2017 12:21 AM