सातारा : सातारा तालुक्यातील आकले येथे अल्पवयीन मुलीने वडिलांचा गळा आवळून खून केल्याची घटना ताजी असतानाच साताऱ्यातही मुलीच्या पाच ते सहा मित्रांनी वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जखमी वडिलांवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चंद्रेशेखर भुरके (वय ५९, रा. यादोगोपाळ पेठ, सातारा) असे जखमी वडिलांचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी, भुरके हे राजवाडा येथील एका हॉटेलमध्ये काम करतात. दि. १५ रोजी रात्री साडेदहा वाजता ते घरी जात असताना नगर वाचनालयाजवळ एका मुलाने त्यांना हाक मारली. त्यामुळे ते थांबले. तेथे असणाºया पाच ते सहाजणांनी अचानक त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यातील एकाने चाकूने डोक्यात वार करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी भुरके यांनी हाताने तो वार चुकविला. त्यांच्या डाव्या हातावर चाकूचा वार वर्मी बसल्याने ते रक्तबंबाळ झाले. पाठीत, बरकडीवर लाथाबुक्या मारून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यांना मारहाण सुरू असताना त्यांनी आरडाओरड केली. त्यावेळी तेथे काहीजण आले. त्यामुळे संबंधित हल्लेखोर तेथून पसार झाले. रिक्षा चालकांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांच्यावर तत्काळ शस्त्रक्रिया केली. त्यांच्या डाव्या हाताला आठ टाके पडले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयातील पोलिसांनी त्यांचा जबाब घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी भीतीने हा प्रकार सांगितला नाही.
तू जर पोलिसात गेल्यास तर तुला जीवे मारीन, अशी संबंधितांनी त्यांना धमकी दिली होती. त्यामुळे त्यांनी आपण जिन्यावरून पडलो असल्याचे पोलिसांना सांगितले होते. परंतु मी जर गप्प बसलो तर मला आणखी त्यांच्यापासून धोका होईल, याची जाणीव त्यांना झाल्याने त्यांनी सिव्हिलमधील पोलिसांकडे घडलेल्या खरा प्रकार सांगितला. हल्ला करणाऱ्यांमध्ये मुलीचा मित्र होता. त्याला मी ओळखतो, असेही भुरके यांनी पोलिसांना सांगितले आहे.