मिरज : मिरजेतील गुरुवार पेठेत कबुतराच्या पेटीवरून वाद होऊन हुसेन बशीर बेग (वय ३१, रा. गुरुवार पेठ, मिरज) या तरुणावर रेकॉर्डवरील गुन्हेगार इशरत इरफान बारगीर (वय ३०) व त्याचे साथीदार इसार रफिक सय्यद (वय २०), सागर राजेश वाघेरा (वय २५, सर्व रा. मिरज) यांनी कोयत्याने जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न केला. कोयता हल्ला चुकवून हुसेन बेग याने पलायन केल्याने अनर्थ टळला. याप्रकरणी पोलिसांनी बारगीर याच्यासह तिघांना अटक केली आहे.
हुसेन बेग याची गुरुवार पेठेत अग्रवाल बिल्डिंगशेजारी कबुतराची पेटी आहे. इशरत बारगीर व त्याचे साथीदार इसार आणि सागर, हुसेन बेग रस्त्यावरून जात असताना बेग यास अडवून ‘मी यापूर्वी तुझी कबुतरे घेऊन गेलो आहे, आता तुझी पूर्ण पेटी मी घेऊन जाणार आहे, तू काय करतोस बघू’ म्हणून शिवीगाळ केली. त्यानंतर काही वेळाने हुसेन बेग कबुतराच्या पेटीजवळून घराकडे जात असताना इशरत याने हातात ऊसतोडीचा कोयता घेऊन त्यास अडविले. त्याचे साथीदार इसार व सागर यांनी हातातील कोयता दाखवत ‘तुला जिवंत ठेवत नाही’, असे म्हणत इशरत व त्याच्या साथीदारांनी हुसेन बेग यास हाताने, लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. कबुतर पेटीकडे जात असताना हुसेन बेग याने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केल्याने इशरत याने हुसेन याच्या मानेवर वार केला. तो वार हुसेन याने चुकवला असता पुन्हा त्याने डोक्यावर वार करण्याचा प्रयत्न केल्याने हुसेन तेथून घरात पळून गेला.
याप्रकरणी हुसेन बेग याने शहर पोलिसांत इशरत बारगीर व त्याच्या साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली असून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून इशरत बारगीर व त्याचे साथीदार निसार सय्यद, सागर वाघेरा यांना अटक केली आहे.