मिरजेत महापालिकेच्या भाेंगळ कारभारामुळे सफाई कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. महापालिकेकडे लाखो रुपये किमतीची सक्शन व्हॅन असतानाही ड्रेनेज विभागातील कर्मचाऱ्यांना १५ फूट खोल ड्रेनेजमध्ये उतरून हाताने गाळ काढावा लागत आहे. ड्रेनेज चेंबरमधील विषारी वायूमुळे यापूर्वी राज्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. मात्र कोणतीही सुरक्षा साधने नसताना महापालिका ड्रेनेज कामगारांना खोलवर ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून हाताने गाळ काढावा लागत आहे. शनिवारी मिरज एमआयडीसी रस्त्यावर मैदा फॅक्टरीजवळ ड्रेनेज विभागातील कामगार खोल ड्रेनेज चेंबरमध्ये उतरून हाताने गाळ काढत असल्याचे दिसून आल्यानंतर सफाई कर्मचारी संघटनेचे डॉ. महेशकुमार कांबळे यांनी महापालिका ड्रेनेज विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. उन्हाळ्यात उष्णतेमुळे चेंबरमध्ये विषारी वायू तयार होतो. त्यामुळे कामगारांच्या जीवाला धोका असताना हे काम करण्यास भाग पाडणाऱ्या अधिकाऱ्यांचा व कामगारांच्या पिळवणुकीचा सफ़ाई कर्मचारी संघटनेतर्फे निषेध करण्यात आला. ड्रेनेज चेंबर सफाईसाठी सक्शन व्हॅनचा वापर न करता कामगारांवर अन्यायाच्या विरोधात संघटनेतर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
मिरजेत सफाई कामगारांचा जीव धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 4:23 AM