मिरज शहर व तालुक्यातील अनेक गावांत कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील ६४ हजार रुग्णांपैकी वाळवा तालुक्यात सर्वाधिक ९,३०० रुग्ण असून, त्यानंतर मिरज तालुक्यातील विविध गावांतील आठ हजार रुग्ण आहेत. महापालिका क्षेत्रात सांगली, मिरज व कुपवाड शहरांत तब्बल २३ हजार रुग्णांची नोंद झाली असून, यापैकी मिरज शहरातील सात हजार रुग्ण आहेत. जिल्ह्यातील सुमारे अडीच हजार मृतांमध्ये मिरज तालुक्यातील २८० व शहरातील २६०, अशा ५४० जणांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचीही संख्या मिरज तालुक्यात सर्वाधिक आहे. गतवर्षी नोव्हेंबरपासून कमी झालेली मिरजेतील कोविड रुग्णांची संख्या एप्रिलपासून दररोज झपाट्याने वाढत आहे. शहरात व तालुक्यातील अनेक गावांत दररोज तीनशेवर कोविड रुग्ण सापडत आहेत.
उपचार व तपासणी सुविधांमुळे मिरजेतील वैद्यकीय क्षेत्राची ख्याती आहे. गतवर्षी कोविड संसर्गादरम्यान खासगी दवाखान्यांकडे रुग्णांनी पाठ फिरविली होती. डिसेंबरपासून खासगी रुग्णालयात पुन्हा रुग्णांची गर्दी सुरू झाली. मात्र, मार्चपासून कोविड रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मिरजेतील खासगी रुग्णालयात कोविड उपचार सुरू झाले आहेत. मात्र, मिरजेतील कोविड रुग्णालयांना ऑक्सिजनटंचाईचा फटका बसला आहे. ऑक्सिजनअभावी खासगी रुग्णालयात उपचारासाठी रुग्ण दाखल करुन घेणे बंद केल्याने कोरोना रुग्णांना उपचार मिळणे कठीण झाले आहे.
चाैकट
वैद्यकीय कर्मचाऱ्यांना संसर्ग सुरूच
गतवर्षी मिरजेतील अनेक रुग्णालयांत डाॅक्टर, परिचारिका व कर्मचाऱ्यांना काेराेना संक्रमणाला तोंड द्यावे लागले होते. यावर्षी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाल्याने संक्रमणाचे प्रमाण कमी असले तरी फेसशील्ड, मास्क, पीपीई किट, ग्लोव्हज यासह सुरक्षा साधनांचा वापर करूनही वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग सुरूच आहे.
चाैकट
रुग्णालयात बेड मिळणे कठीण
मिरजेत शासकीय कोविड रुग्णालयासह अनेक कोविड रुग्णालयांत रुग्णांवर उपचार सुरू आहेत. डाॅक्टर मंडळी जीव धोक्यात घालून रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, जिल्ह्यात व मिरजेत रुग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड रुग्णालयात बेड मिळणे कठीण झाले आहे. वैद्यकीय पंढरी मिरजेत उपचाराअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.