मिरज न्यायालयाची इमारत जीर्ण झाल्याने ऑक्टोबर २०१८ पासून मिरज न्यायालय सांगलीतील राजवाडा चौकात जुन्या न्यायालय इमारतीत स्थलांतरित करण्यात आले. राजवाडा चौक पूरपट्ट्यात येत असतानाही मिरज न्यायालय येथे हलविण्यात आले. मिरज न्यायालयाच्या जुन्या इमारतीची दुरुस्ती करता येणे शक्य आहे. यासाठी बांधकाम विभागाने सुमारे १ कोटी ३४ लाखांचे दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रकही जिल्हा न्यायालयास सादर केले आहे; मात्र न्यायालय इमारतीच्या दुरुस्तीबाबत निर्णय झाला नसल्याने सांगलीत मिरज न्यायालय सुरु आहे.
गेले तीन महिने कोरोना साथीमुळे मिरज न्यायालयाचे कामकाज अंशत: सुरू होते. त्यातच पुरामुळे कामकाज ठप्प होऊन न्यायालयीन कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. राजवाडा चौकात पुराच्या पाण्याने दोन वर्षांपूर्वी व यंदाही मिरज न्यायालयाचे कामकाज ठप्प आहे. फौजदारी व तातडीचे कामकाज विजयनगर येथे जिल्हा न्यायालयात सुरु आहे. यामुळे मिरजेतील पक्षकार व वकिलांची गैरसोय होत आहे.
चाैकट
मिरजेतील इमारतीची दुरुस्ती शक्य
मिरज न्यायालयाची इमारत दुरूस्ती होऊ शकते, असा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रशासनास दिला आहे. मात्र तरीही, मिरज न्यायालय सांगलीतच सुरु ठेवण्यात आल्याने गेल्या सव्वादोन वर्षांत पक्षकार व वकिलांचे हाल सुरु आहेत. न्यायालय पुन्हा मिरजेत स्थलांतरासाठी न्यायालय कृती समितीतर्फे सर्वपक्षीय जनआंदोलन करणार असल्याचे मिरज न्यायालय कृती समितीचे अॅड. ए. ए. काझी यांनी सांगितले.