सदानंद औंधेमिरज (जि. सांगली) : गेल्या दहा वर्षांपासून बंद असलेल्या मिरज शासकीय डेअरीत कोकण व मराठवाड्यातून येणारे अतिरिक्त दूधही गेल्या दोन महिन्यांपासून बंद झाले आहे. एक लिटरही अतिरिक्त दूध येत नसल्याने मिरज शासकीय दूध डेअरीचे संकलन शून्यावर आले आहे.मिरजेतील शासकीय दूध डेअरी मुंबईनंतर राज्यातील सर्वात मोठी डेअरी आहे. सुमारे दोन लाख लिटर दुधावर प्रक्रियेची येथील यंत्रणा आता कालबाह्य झाल्याने येथील बंद मशिनरी भंगारात काढण्याची तयारी सुरू आहे. खासगी व सहकारी संघाच्या स्पर्धेत टिकू शकत नसल्याने शासकीय दूध डेअरीच्या नूतनीकरणाचा प्रस्ताव बारगळला आहे.डेअरी बंद असली तरी कोकण व मराठवाड्यातून दररोज येणाऱ्या १० ते २५ हजार लिटर अतिरिक्त गायींच्या दुधावर वारणा व राजारामबापू या खासगी डेअरीत पावडर निर्मिती करून घेण्याचे काम सुरू होते. मात्र, यावर्षी मार्चपासून कोकण व मराठवाड्यातून येणारे अतिरिक्त दूध येणे बंद झाल्याने डेअरीची पावडर निर्मिती पूर्णपणे बंद झाली आहे.दुधाची पळवापळवी सुरूउन्हाळा, सुटीच्या हंगामात दुधाचे उत्पादन कमी व हॉटेल, रेस्टाॅरंट, मिठाई, आइस्क्रीम व उपपदार्थ निर्मितीसाठी दुधाच्या मागणीत वाढ झाली आहे. यामुळे मे महिन्यात गायींच्या दूध दरात दोन रुपयांनी वाढ झाली आहे. जिल्ह्यात १२ खासगी, ७ सहकारी व १७ मल्टिस्टेट संघ दूध संकलन करतात. त्यातच आता अमूलच्या संलग्न खासगी डेअऱ्यांनी जिल्ह्यात दूध संकलन सुरू केल्याने दुधाची पळवापळवी सुरू आहे. या स्पर्धेत शासकीय दूध योजनेचा टिकाव लागलेला नाही.
मिरज शासकीय डेअरीचे दूध संकलन शून्यावर; कोकण, मराठवाड्यातील अतिरिक्त दूध पुरवठा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2023 11:58 AM