मिरज : पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखालील पुराचे पाणी ओसरल्याने गुरूवारपासून मिरज-कोल्हापूरदरम्यानरेल्वेवाहतूक तब्बल दहा दिवसानंतर सुरू झाली. रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीच्या कामासाठी दि. २३ आॅगस्टपर्यंत मिरज-सोलापूर रेल्वे वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे.कोल्हापूरजवळ पंचगंगा नदीवरील रेल्वे पुलाखाली धोक्याच्या पातळीपर्यंत पुराचे पाणी वाढल्याने दि. ५ पासून मिरज-कोल्हापूर रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली होती.
यामुळे कोल्हापुरातून सुटणाऱ्या महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना, राणी चेन्नम्मा, महाराष्टÑ, हरिप्रिया एक्स्प्रेस मिरजेतून सोडण्यात आल्या. पाऊस व पुरामुळे अनेक रेल्वेगाड्या रद्द झाल्याने रेल्वेगाड्यांचे वेळापत्रकही कोलमडले. गेल्या चार दिवसात मिरजेतून रूकडीपर्यंत पॅसेंजर रेल्वे सुरू करण्यात आली होती. गुरूवारपासून पॅसेंजरसह राणी चेन्नम्मा व हरिप्रिया एक्स्प्रेस कोल्हापुरातून सोडण्यात आली.
दि. १७ पासून मुंबईकडे जाणाºया महालक्ष्मी, सह्याद्री, कोयना एक्स्प्रेस सुरू होणार आहेत. रेल्वेमार्गाच्या दुरूस्तीसाठी दि. २३ आॅगस्टपर्यंत मिरज-सोलापूर रेल्वे वाहतूक बंद आहे. दि. २३ पर्यंत सोलापूर-मिरज एक्स्प्रेस, दि. २२ पर्यंत कोल्हापूर-सोलापूर एक्स्प्रेस, दि. २४ पर्यंत कोल्हापूर-नागपूर, कोल्हापूर बिदर, एक्स्प्रेस व पंढरपूर-मिरज पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.