अविनाश कोळी, मिरज : मिरज कृष्णाघाटदरम्यान रेल्वे उड्डाणपुलाच्या कामासाठी रेल्वे गेट दि. ०३ ऑक्टोबरपासून एक महिना बंद करण्यात येणार आहे. रेल्वेमार्गापलीकडे वसाहतींकडे जाणारे रेल्वे गेट क्रमांक एक यापूर्वीच बंद करण्यांत आल्याने येथील नागरिकांना येण्या-जाण्याचा रस्ता बंद होणार आहे. येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घालून रेल्वे गेट खुले करण्याची मागणी केली आहे.
मिरजेत रेल्वेस्थानकापलिकडे कोल्हापूर चाळ, वाघमारे प्लॉट सावित्रीबाई फुले झोपडपट्टीकडे जाण्यासाठी रेल्वे गेट क्रमांक एक रेल्वेने बंद केल्याने येथील दोन हजार नागरिकांची कृष्णाघाट मार्गावरून ये-जा सुरू आहे.
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे गेट बंद करताना पर्यायी रस्ता देण्यात आला होता. तेथेही रेल्वेमार्गाचे काम सुरू केल्याने या मातीच्या रस्त्यातून जाता-येता येत नाही. येथील महिलांना कामासाठी बाहेर जाता येत नाही. शाळकरी मुला मुलीना दुचाकीवरुन रेल्वेमार्गापलीकडे जाता येत नाही. आता कृष्णाघाट रस्त्यावरील गेट एक महिन्यासाठी बंद झाल्यास या वसाहतीत वाहने जाण्यास रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे मिरज-जयसिंगपूरदरम्यान रेल्वे गेटक्रमांक एक सुरू करून देण्याची मागणी रणधीर कांबळे, नानासाहेब वाघमारे यांच्यासह सावित्रीबाई फुले वसाहत, वाघमारे प्लाॅट येथील नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.