मिरज : मिरजेत १५ लाख कर्जापोटी ५४ लाख वसूल करून आणखी ८० लाखाची मागणी करून मालमत्ता नावावर करण्यासाठी धमकावल्याबद्दल राजू ऊर्फ रियाज गुलाब बागवान (वय ४०, रा. आशीर्वाद काॅलनी, शंभरफुटी रोड, मिरज) या सावकारास पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी अकबर बख्तावर मोमीन यांनी गांधी चाैक पोलिसांत फिर्याद दिली आहे.
माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे जावई अकबर मोमीन यांनी जमीन खरेदी विक्री व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी राजू बागवान याच्याकडून १५ लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. मोमीन यांनी पाच वर्षात बागवान यास वेळोवेळी ५४ लाख रुपये परत दिले; मात्र त्यानंतरही राजू बागवान याने निपाणी येथील आण्णा नामक सावकाराची ही रक्कम असून, तुम्ही वेळेवर पैसे दिले नसल्याने ३० टक्के दंडासह आणखी ६५ लाख रुपये व १५ लाख रुपये मुद्दल द्यावे लागणार असल्याचे सांगितले. पैशाच्या वसुलीसाठी बागवान याने वारंवार मोमीन यांच्या घरात येऊन घरातील महिलांसमोर शिवीगाळ केली. रात्री-अपरात्री मोमीन यांच्या घरासमोर मोटार थांबवून शिवीगाळ मालमत्ता नावावर करून देण्यासाठी धमकावल्याचेही मोमीन यांनी तक्रारीत म्हटले आहे.
चार दिवसांपूर्वी ‘ आज पैसे पाहिजेत, नाही तर आजचा दिवस तुम्हाला धोक्याचा आहे’, असा मेसेज बागवान याने मोबाइलवर पाठवल्याने मोमीन यांनी गांधी चाैक पोलिसांत धाव घेत त्याच्याविरुद्ध फिर्याद दिली. खासगी सावकारी व घरात घुसून धमकावल्याबद्दल पोलिसांनी बागवान यास अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे अधिक तपास करीत आहेत.